जळगाव : चोपडा शहरातील जयहिंद कॉलनी परिसरात अन्न-औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांची मोटारही जप्त करण्यात आली असून, चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल न करण्यासाठी मंत्रालयस्तरावरून पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांकडून करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चोपडा येथील जयहिंद कॉलनी परिसरात तीन तोतया अधिकारी त्यांच्या ताब्यातील वाहन उभे करून संशयास्पदरीत्या फिरत असताना लक्षात आले. दोन सुज्ञ नागरिकांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव यांना संबंधित प्रकार भ्रमणध्वनीवरून कळविला. सचदेव यांनी तत्काळ चोपडा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संतोष चव्हाण यांना त्याबद्दल माहिती दिली. निरीक्षक संतोष चव्हाण यांच्यासह पथकाने धाव घेतली. त्यांना ते संशयास्पदरीत्या तोतयागिरी करताना आढळले.
हेही वाचा…मुक्त विद्यापीठाकडून राबविले जाणारे स्कूल कनेक्ट अभियान काय आहे ? वाचा सविस्तर…
जितेंद्र गोपाल महाजन व त्यांच्यासोबत असलेले सचिन पाटील यांच्याकडून सोलापूर विभागात पोलीस कर्मचारी असलेला राहुल देवकाते (३५, रा. साकटी रोड, पंढरपूर, जि. सोलापूर), विनायक चवरे (३५, गोविंदपुरा, सोलापूर रोड, गुर्जरवाडा, जि. सोलापूर), लक्ष्मण ताड (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) या तिघांनी आम्ही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आहोत, असे भासवून पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यातील संशयित राहुल देवकाते व विनायक चवरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मण लाड मात्र फरार झाला.
जितेंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अजित सावळे तपास करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयितांच्या ताब्यातील मोटारही जप्त केली. मोटारीवरही संशयितांनी बनावट क्रमांकाची पाटी लावली असून, ती खंडणीकामी वापरली जात असल्याचे तपासाधिकारी अजित सावळे यांनी सांगितले.
हेही वाचा…नाशिक : नथुराम गोडसे उदात्तीकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस सेवादलाचा मूक सत्याग्रह
दरम्यान, देवकाते, चौरे, लाड या तिघा भामट्यांनी शुक्रवारी तरडी (ता. शिरपूर) येथील सचिन पाटील यांनाही अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून एक लाख रुपयांची खंडणी उकळली. ही घटना शुक्रवारी तरडी (ता. शिरपूर) गावात घडली. हे तिन्हीजण तोतये अधिकारी असल्याचे सचिन पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी सचिन पाटील यांची फिर्याद नोंदवून घेत तिन्ही तोतया अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांवर खंडणी व फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.