जळगाव : राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका वाढला असून, याच परिस्थितीत वादळी पाऊस आणि गारपिटीला पोषक हवामान होत आहे. मंगळवारी दुपारी शहरात तुरळक, तर जामनेर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सावरला, आमखेडे देवी व लोणी परीसरात पावसाच्या जोराने मका, केळी व ज्वारी या दुबार पिकांचे मोठे नुकसान झाले.
सध्या जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंशापुढे सरकला आहे. उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात पारा चाळिशीपार गेला होता. त्यामुळे उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. रविवारी जळगाव शहरात ढगाळ वातावरण होऊन दुपारी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आणि दुपारपासून ढगाळ वातावरण असल्याने किंचित दिलासा मिळाला. मात्र, तापमान ४० अंशांवर होते. सोमवारी जिल्ह्यात अशीच स्थिती कायम होती. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास शहरात पावसाच्या तुरळक सरी पडल्या, तर जामनेर तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला.
हेही वाचा : धुळ्यात काँग्रेसमधून डाॅ. शोभा बच्छाव यांचे नाव चर्चेत
तालुक्यातील सावरला, आमखेडे देवी व लोणी परिसरात पावसाच्या जोराने मका, केळी व ज्वारी या दुबार पिकांचे मोठे नुकसान झाले. सकाळपासून कडक ऊन असताना अचानक दुपारी ढग दाटून आले. पाऊस तासभर सुरूच होता. तळेगाव, तोंडापूर व पहूर परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. शेतात कापणीला आलेला मका, ज्वारी व केळीचे पीक वार्यामुळे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. लोणी गावातील ७० टक्के घरांवरील पत्रे उडाली. शेतशिवारातील झाडे उन्मळून पडली. चारा ओलाचिंब झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.