जळगाव : शहरासह जळगाव जिल्ह्यात हत्यांचे सत्र थांबता थांबत नाही. आठवडाभरानंतरही हत्यांची मालिका सुरूच असून, जळगावात सोमवारी पहाटे आणखी एक हत्या झाल्याचे उघड झाले. शहरातील नाथवाडा परिसरातील सिंधी कॉलनी रस्त्यावर ही हत्या झाली. पंधरवड्यातील ही दुसरी हत्या आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगावातील नाथवाडा परिसरातील रहिवासी ललित वाणी (४५, रा. सिंधी काॅलनी, नाथवाडा, जळगाव) हे गाडेगाव येथील सुप्रीम कंपनीत कामाला आहेत. रात्री पावणेबाराच्या सुमारास कामावरून ते सिंधी कॉलनी-नाथवाडा रस्त्याने घरी येत होते. सोमवारी सिंधी कॉलनी रस्त्यावर सकाळी कामाला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या काही जणांना मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीबाहेर वाळूवर प्रौढ व्यक्ती झोपलेली दिसून आली. त्याची बॅगही जवळच पडून होती. काही वेळानंतर वर्दळ वाढली, तरी संबंधित व्यक्ती उठत नसल्यामुळे काहींनी जवळ जाऊन पाहिले असता, तो मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला कळविताच निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने धाव घेतली. त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना घटनेची माहिती कळविली. त्यांनीही तातडीने घटनास्थळ गाठले. गावित व आव्हाड यांनी माहिती व पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केला.

हेही वाचा : धुळ्याजवळ गॅस टँकरचा पेट

मृताचा खून का केला, कोणी केला, याचा उलगडा झाला नसून, ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळावरुन गुन्ह्याच्या तपासासाठी नमुने घेतले आहेत. पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली आहेत. कुटुंबाकडूनही माहिती घेतली जात आहे. मृताच्या मागे आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने वाणी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीने डोके वर काढले असल्याने दरोडे, चोर्‍या, हत्या अशा घटना दिवसागणिक होत आहेत. २३ मे रोजी शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील हॉटेल भानूमध्ये किशोर सोनवणे याची जुन्या वादातून हत्या झाली होती. त्यापाठोपाठ आता पुन्हा हत्या झाल्याने जळगाव हादरले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon another one murder within 15 days css