जळगाव : कधी पावसात भिजायचं, कधी रडायचं, कधी आजारी पडायचं, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. शरद पवारांची तब्येत व्यवस्थित नसते, त्यांच्या तब्येतीवर बोलणे उचित होणार नाही. मात्र, रोहित पवार हे सध्या थोडे काही झाले की लगेच रडायला लागतात. रडून निवडणुका लढता येत नाहीत आणि जिंकता येत नाहीत. तुम्ही फार काळ मतदारांना भावनिक करू शकणार नाहीत. रोहित पवारांनी नेमक्या मुद्यावर व विकासावर बोलावे आणि त्यावर मतांचा जोगवा मागावा, अशी टीका ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिव प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापक अर्थात सुकाणू समिती सदस्यांची बैठक झाली. बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रावेर आणि जळगाव मतदारसंघांचा आढावा घेणयत आला. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीतील विषयांवरील चर्चेची माहिती देताना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार, तसेच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

हेही वाचा : शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीने महायुतीच्या अडचणीत भर

भरसभांमध्ये रोहित पवार हे रुमालाने डोळे पुसत असतात. मात्र, भावनविवश होऊन चालणार नाही. उद्धव ठाकरे अनेक वर्षे आमच्याबरोबर होते. त्यावेळी ठाकरे हे नरेंद्र मोदींचे कौतुक करीत होते. आता विरोधात गेले म्हणून काहीही बोलावे का ? आमच्या भरवशावरच तुमच्या १८ जागा निवडून आल्या. आता नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करणार्‍या उद्धव ठाकरेंचे आमदार व खासदार हे भाजपच्या जीवावर निवडून आले, आम्ही नसतो तर त्यांचे १५ आमदार तरी निवडून आले असते का, असा प्रश्नही महाजन यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : नाशिकमध्ये चौरंगी, दिंडोरीत तिरंगी लढत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हेमंत करकरे यांच्यात संघर्ष होता, या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरही महाजन यांनी तोंडसुख घेतले. कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही, असे राऊत बोलतात. त्यांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही. जनताही त्यांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही, असा दावाही गिरीश महाजन यांनी केला.