जळगाव : भाजपचे जळगाव मतदारसंघातील खासदार उन्मेष पाटील यांच्यासह पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी बुधवारी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पाटील यांच्या शहरातील जनसंपर्क कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटविण्यात आले असून, करण पवार यांच्या नावाचे प्रचार फलक समाजमाध्यमांतून प्रसारित होत आहेत. भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यानंतर खासदार उन्मेष पाटील हे काही दिवसांपासून नाराज होते. पक्षांतर्गत वादाचा फटका पाटील यांना बसल्याचे बोलले जाते. पाटील यांच्या उमेदवारीस जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांचा विरोध होता, असे म्हटले जाते.
बुधवारी ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वीच पाटील यांच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील जनसंपर्क कार्यालयात असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटवण्यात आले होते. कार्यालयाबाहेरील त्यांच्या नावाच्या फलकावरील दोन्ही बाजूंनी असलेले कमळ चिन्हही दूर करण्यात आले. उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला असला तरी करण पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जात असल्याने पवार यांचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा फलक समाजमाध्यमांतून प्रसारित झाला आहे. त्यातून पवार हेच जळगाव लोकसभा जिंकतील, असा उल्लेख करण्यात आला आहे. फलकावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे व पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यासह उन्मेष पाटील यांची छायाचित्रे झळकली आहेत. वेगवेगळ्या व्हॉटसअॅप ग्रुपवर करण पवारांसह उन्मेष पाटील यांचे ठाकरे गटाच्या वतीने स्वागत केले जात आहे.