जळगाव : तीन दिवसांपूर्वी टोळक्याने केलेल्या गोळीबारात जखमी चाळीसगाव येथील भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांचा शनिवारी मृत्यू झाला. शहरासह जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. सर्वसामान्यांसह राजकीय पदाधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांवर जीवघेणे होत आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार हेही वाळूमाफियांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातही अट्टल गुन्हेगार आमनेसामने आल्यानंतर थेट बंदुकाही काढण्यात आल्या. मात्र, शहर वाहतूक शाखेच्या सतर्कतेने चौघांना ताब्यात घेत थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले. चाळीसगाव शहरात तीन दिवसांपूर्वी माजी नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांच्यावर त्यांच्या संपर्क कार्यालयातच मोटारीतून आलेल्या पाचपैकी दोघांनी गावठी बंदुकीतून गोळ्या झाडल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले. मोरे यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचे निधन झाले.

हेही वाचा…धुळ्यात गुन्हेगारांनी घेतली ही शपथ

दरम्यान, संपर्क कार्यालयातील संजय बैसाने यांच्या फिर्यादीवरून पाच हल्लेखोर व कट रचणारे दोन, अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाकडून संशयितांचे शोधकार्य करीत असताना नागद- कन्नड रस्त्यावरील सायगव्हाण येथे गुन्ह्यात वापरलेली मोटार मिळून आली. मोटारीत दोन जिवंत काडतुसे, कोयता आदी साहित्य मिळून आले. पोलीस पथकाने परिसरातील हॉटेलांसह कन्नड गावातही तपास व पाहणी केली. मात्र, संशयित मिळून आले नाहीत. संशयितांच्या शोधकामी पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली. आता महेंद्र मोरे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने याप्रकरणी खुनाचे कलम लावण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले. उपनिरीक्षक सुहास आव्हाड तपास करीत आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon chalisgaon firing case former bjp corporator died during treatment psg