जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कार्यव्यस्ततेमुळे स्थगित झालेला २६ ऑगस्टचा तालुकास्तरीय शासन आपल्या दारी उपक्रम आता नऊ सप्टेंबरला निश्चित झाला असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. पाचोरा येथील शिवालय या संपर्क कार्यालयात आमदार पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
शासनाच्या लोककल्याणकारी योजना व व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा यासाठी राज्य शासनातर्फे राज्यभर शासन आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जिल्हानिहाय घेतला जात आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून तालुकास्तरीय शासन आपल्या दारी उपक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले असून, जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय शासन आपल्या दारी उपक्रम पाचोरा येथे होणार आहे.
हेही वाचा : धुळ्यात दूध भेसळ करणाऱ्या आठ विक्रेत्यांवर कारवाई
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते नगरदेवळा येथील औद्योगिक वसाहत, पाचोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल, ऑक्सिजन पार्क यांसह विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन केले जाणार आहे. शिवाय, पाचोरा व भडगाव तालुक्यांतील सुमारे १५ हजार लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे नियोजन प्रशासन स्तरावर करण्यात आले आहे.