जळगाव : मध्य प्रदेशच्या हद्दीत असलेल्या आणि महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील चोपडा तालुक्यालगतच्या उमर्टी गावातून शस्त्रांची होणारी तस्करी पुन्हा उघडकीस आली आहे. बसमधून तीन गावठी बनावटीच्या बंदुकांसह काडतुसे आणि रोख रक्कम घेऊन चोपडा शहरात येणाऱ्या राजस्थानमधील तरुणाला पोलिसांच्या पथकाने अटक केली. चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस्थानमधील तरुण गावठी बनावटीच्या बंदुका घेऊन येत असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील यांना मिळाली. त्यांनी सहायक निरीक्षक संतोष चव्हाण, उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांसह इतरांचे पथक नियुक्त केले.
हेही वाचा : रब्बीसाठी पाणी न सोडल्यास आंदोलन – ठाकरे गटाचा धरणगाव तहसीलदारांना इशारा
पथकाने चुंचाळे रस्त्यावर सापळा रचत उमर्टीकडून चोपड्याकडे येणारी बस थांबविली. बसमधील संशयित तरुणाची ओळख पटवून त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये एक लाख ३० हजार रुपयांच्या गावठी बनावटीच्या तीन बंदुका, १० हजारांची १० जिवंत काडतुसे, पाच हजारांचा भ्रमणध्वनी संच यांसह तीन हजार ३० रुपयांची रोकड, असा सुमारे एक लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तो पथकाने हस्तगत करीत संशयित हनुमान चौधरी (२१, रा. लोहावत, राजस्थान) याला ताब्यात घेतले. त्याने गावठी बनावटीच्या बंदुकांसह काडतुसे उमर्टी येथील अनोळखी व्यक्तीकडून सत्रासेन येथे घेतल्याचे पोलिसांना सांगितले.