जळगाव : जिल्ह्यातील ११ मतदारसंघात पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुमारे १३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी ११७ उमेदवारांची अनामत जप्त झाली. भाजपचे पाच, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) पाच आणि राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला.
जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर १३९ उमेदवार रिंगणात होते. त्यातही सर्वाधिक २९ उमेदवार जळगाव शहरात तसेच सर्वात कमी आठ उमेदवार चाळीसगाव मतदारसंघात होते. जिल्हाभरात ८१ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, ज्यामध्ये स्वपक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केलेल्या महायुतीसह महाविकास आघाडीच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. संबंधित सर्व अपक्षांना जनाधार न मिळाल्याने पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. ११ मतदारसंघात महायुतीसमोर महाविकास आघाडीचा धुव्वा उडालेला असताना, अपक्ष तसेच लहान पक्षांकडून अर्ज दाखल करणाऱ्या जवळपास ८४ उमेदवारांना १००० पेक्षाही कमी मते मिळाली. काहींना तर जेमतेम दोन आकडी मते मिळाली आहेत.
हेही वाचा…दरोड्याच्या तयारीतील दोघे ताब्यात
१७,६१९ मतदारांची नोटाला पसंती
निवडणुकीच्या रिंगणातील एकही उमेदवार योग्य न वाटल्यास नोटाच्या पर्यायाला मतदान करून मतदार आपली असहमती दर्शवितात. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघात १७,६१९ मतदारांनी नोटाला पसंती दिली. चोपड्यात सर्वाधिक २४०५ मते तसेच मुक्ताईनगरात सर्वात कमी ६२५ मते नोटाला पडली आहेत.