जळगाव : जिल्ह्यासह राज्यातील दूध उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आहेत. दुधाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे शेतकर्‍यांसह राज्यातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. दुधाला किमान ३४ रुपयांचा दर मिळावा, या मागणीसाठी चाळीसगाव येथील दूध उत्पादकांनी रविवारी जोरदार निदर्शने करीत रास्ता रोको आंदोलन करून, रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारसह जिल्हा दूध उत्पादक संघाचा निषेध केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या राज्यभर दुधाचे भाव कोसळल्यामुळे व पशुखाद्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे चाळीसगाव येथील खरजई नाका भागात रविवारी दुपारी दूध संस्थेच्या सदस्य उत्पादकांनी रास्ता रोको व निषेध आंदोलन केले. जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक प्रमोद पाटील, तुषार निकम, मनोहर पाटील, दत्तूनाना देशमुख, चिमणराव पाटील (गणेशपूर), संतोष देशमुख (पातोंडा), चंद्रकांत ठाकरे (डामरूण) यांच्या नेतृत्वात तीनशेपेक्षा अधिक दूध उत्पादक शेतकर्‍यांनी निषेध आंदोलन केले. दुधाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, कोण म्हणतंय देणार नाही…घेतल्याशिवाय राहणार नाही, जागा हो जागा हो दूध संघ जागा हो अशी घोषणाबाजी करीत रस्त्यावर दूध ओतत राज्य सरकार व जिल्हा दूध उत्पादक संघाविरोधात रोष व्यक्त करीत निषेध करण्यात आला.

हेही वाचा : धुळे जिल्हा परिषदेत निधी अपहार प्रकरण : वादग्रस्त भास्कर वाघची मालमत्ता ३४ वर्षांनी सरकारजमा

प्रमोद पाटील यांनी, जिल्हा दूध उत्पादक संघ चुकीची भूमिका घेत असल्याचे सांगितले. संघाच्या बैठकीतही दुधाला योग्य भाव दिला पाहिजे, असे वारंवार सांगितले. तरीही प्रशासन मनमानी करीत आहे. संघाने दोन ते तीन रुपयांचा तोटा सहन करून उत्पादकांना भाव वाढवून द्यावा अथवा प्रतिलिटर तीन रुपये शासनाने अनुदान देऊन ३४ रुपये भाव दिलाच पाहिजे. यंदाचा बोनसही दिलाच पाहिजे, अशी मागणी केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon district chalisgaon milk producing farmers protested to get the right price for milk css