जळगाव: रावेर तालुक्यात वीज कोसळल्याने पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असलेल्यांना मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मंगळवारी रावेर तालुक्यातील दोधे येथे वीज कोसळल्याने मीराबाई जमरे (३०), पूजा जमरे (१३), रेखाबाई खरते (३०), कालू खरते (३०) आणि ज्योती रावत (३२) असे पाच जण गंभीर जखमी झाले. हे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील झिरण्या येथील असून दोधे येथे शेतीच्या कामासाठी आले होते.
हेही वाचा : नाशिक: दोन महिन्यांपासून फरार संशयित ताब्यात
कांग नदीत वाहून गेल्याने तरुणीचा मृत्यू
जोरदार पावसामुळे जामनेर तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला असून खासगी शिकवणी वर्गासाठी कांग नदीच्या पुलावरून पायी जात असलेल्या १८ वर्षीय तरुणी तोल जाऊन पुरात वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी पूनम बाविस्कर ही शिकवणीला जाण्यासाठी निघाली होती. कांग नदीच्या पुलावरून वाहने ये- जा करत असल्याने पूनम ही पुलाच्या कडेने जात होती. तिचे लक्ष पाण्याच्या प्रवाहाकडे गेले असता चक्कर आल्याने ती पुलावरून नदीपात्रात पडून वाहून गेल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरु केली. मृतदेह खादगावजवळील नदीपात्रात काटेरी झुडपाजवळ अडकलेला आढळून आला. पूनमचे आईवडील मोल मजुरी करून उदरनिर्वाह करतात. एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.