जळगाव : सततच्या नापिकीमुळे वाढत असलेल्या कर्जामुळे पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील अल्पभूधारक शेतकर्याने विषारी औषध सेवन करीत आत्महत्या केली. रवींद्र ओंकार चव्हाण (वय ४४, रा. तारखेडा पाचोरा) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
रवींद्र चव्हाण यांनी सततच्या नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने शनिवारी विषारी औषध घेतले. ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने पाचोरा येथील खासगी रुग्णालयात तातडीने दाखल केले; परंतु उपचारादरम्यान चव्हाण यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा… नाशिक : वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांची आत्महत्या
हेही वाचा… वीज पडल्याने गायींचा मृत्यू, तब्बल नऊ महिन्यांनी नुकसान भरपाई; मालेगावमधील घटना
थोड्याशा शेतजमिनीत राबराब राबूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमालाच्या उत्पन्नात आलेली घट व आलेल्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने, तसेच मुलीच्या लग्नाची चिंता,मुलाला शिक्षणासाठी लागणारा खर्च व दैनंदिन जीवनात लागणारा खर्च करणे अवघड झाले होते. याच विवंचनेत चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत रवींद्र चव्हाण यांच्यामागे मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.