जळगाव : धरणगाव ते एरंडोलदरम्यान बांभोरी-टोळी (ता. धरणगाव) येथील स्थानकात बस थांबत नसल्याने गुरुवारी विद्यार्थ्यांनी चक्क रस्त्यावरच ठिय्या मांडून आंदोलन केले. शिवसेना ठाकरे गटाच्या सहसंपर्कप्रमुखांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेत थेट अधिकार्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. अधिकार्यांनी समस्या जाणून सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
बांभोरी-टोळी येथील १५० ते २०० विद्यार्थी धरणगाव येथील शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेत आहेत. रोज ते गावातून बसने प्रवास करीत धरणगावला येतात. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बांभोरी-टोळी येथील स्थानकात बस थांबत नव्हत्या. त्यामुळे गुरुवारी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आंदोलनास सुरुवात केली.
हेही वाचा : मुसळधार पाऊस, दुथडी भरून वाहणारे नदी-नाले, पूरपाणी दुर्लभ; परतीच्या पावसावर संपूर्ण भिस्त
तेथून जात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश चौधरी, संतोष सोनवणे, गजूभाऊ महाजन, शहरप्रमुख भागवत चौधरी, नंदू पाटील यांच्यासह पदाधिकार्यांनी थांबत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेतली. वाघ यांनी धरणगाव येथील महामंडळाच्या अधिकारी नीलिमा बागूल यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत मुलामुलींच्या बससंदर्भातील समस्या मांडल्या. बागूल यांनी समस्या जाणून एक सप्टेंबरपासून बस वेळेवर सोडण्यात येईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे धरणगाव-एरंडोल रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.