जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल येथे महामार्गावरील अमळनेर नाक्याजवळ भरधाव टँकरची दुचाकीला धडक बसल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री हा अपघात झाला. राजू भोई (४६,रा. एरंडोल) आणि दीपक मोरे (३४,रा. शिरसोली,जळगाव) हे दोघे साडूभाऊ होते. रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास महामार्गावरून दुचाकीने घरी जात असताना, भरधाव टँकरची दुचाकीला जोरात धडक बसली. या अपघातात राजू भोई यांचा जागीच मृत्यू झाला, तर, गंभीर जखमी झालेले दीपक मोरे यांचा एरंडोलच्या ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाच्या विरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघातास कारणीभूत ठरलेले टँकर पारोळा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

हेही वाचा : मालेगावजवळ बनावट मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा, ७० लाखांचा ऐवज जप्त

ज्या ठिकाणी भोई आणि मोरे यांचा अपघाती मृत्यू झाला, त्याठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे रविवारी रात्री झालेल्या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाला जबाबदार धरत प्रकल्प संचालकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्ह्यात गेल्याच आठवड्यात विविध ठिकाणच्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता.

Story img Loader