जळगाव : केंद्र आणि राज्य सरकारकडून कृषिविषयक मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षांनी चोपडा येथे गळ्यात कांद्याची माळ घालून मतदानाचा हक्क बजावला.
जळगाव, रावेर या लोकसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी सकाळी सातपासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळी नऊपर्यंत जळगाव मतदारसंघात ६.१४ टक्के, तर रावेर मतदारसंघात ७.१४ टक्के मतदान झाले. सकाळी तुरळक गर्दी होती. मात्र, नऊनंतर मतदान केंद्रांत रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यातील जळगाव मतदारसंघात २०, तर रावेर मतदारसंघात २९ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. दोन्ही मतदारसंघांत महायुती व महाविकास आघाडीतच खरी लढत रंगत आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील तीन हजार ८८६ मतदान केंद्रांत मतदारांसाठी सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. जळगाव मतदारसंघात एक हजार ९८२ आणि रावेर मतदारसंघात एक हजार ९०४ मतदान केंद्रे असून, त्यात २१ अपंग मतदान केंद्रे, ३३ महिला मतदान केंद्रे, ११ युवा मतदान केंद्रे, आणि ५५ आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
हेही वाचा – प्रचार सभांमध्ये दिसत नसल्याविषयीच्या प्रश्नावर गोपीचंद पडळकर का हसले…
केंद्र परिसरात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना यादीतील नाव शोधण्यासाठी मदतकार्य सुरू होते. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी नऊनंतर सूर्यदर्शन झाले. ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा खाली सरकला होता. मात्र, दुपारी ऊन वाढल्यावर मतदानाची गती आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन यांनी सकाळी सातला ओरियन स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. दुसरीकडे शेतीमालाच्या हमीभावासंदर्भात शेतकर्यांमध्ये रोष आहे. कापूस, कांदा यांसह सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी कायमस्वरुपी उठवावी, यासाठी निषेध म्हणून गळ्यात कांद्याची माळ घालून शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी मातोश्री शोभाबाई पाटील यांच्यासह मतदान केले.