जळगाव : शहरातील एका तरुणाने त्याच्या बकरीला चावा घेणाऱ्या भटक्या कुत्र्याला दोरीने बांधून दुचाकीच्या साहाय्याने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेला सलीम अन्सारी हा गुरुवारी एका भटक्या कुत्र्याला दोरीने बांधून दुचाकीच्या मागे फरफटत घेऊन चालला होता. हा प्रकार भाग्येश मगर आणि त्यांच्या काही मित्रांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्वरित दुचाकीस्वार अन्सारी याला अडवून त्याबाबत विचारणा केली. तेव्हा अन्सारीने त्याच्या बकरीला चावा घेतल्यामुळे तो कुत्र्याला अशा पद्धतीने नेत असल्याचे सांगितले. मात्र, हे कृत्य अत्यंत क्रूर असल्याचे लक्षात घेऊन भाग्येश मगर आणि त्यांच्या मित्रांनी कुत्र्याला तातडीने सोडवले. दुचाकीने फरफटत नेल्याने कुत्र्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. तो वेदनेने विव्हळत असल्याने त्वरित त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, अमानुष प्रकाराविरोधात भाग्येश मगर यांनी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी सलीम अन्सारीविरोधात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल केला.

या प्रकारामुळे जळगाव शहरात संतापाची लाट उसळली आहे. याआधीही राज्यात प्राण्यांना त्रास देण्याच्या घटना घडल्या आहेत. एका प्रकरणात साखळीने बांधलेल्या कुत्र्याला मारहाण करण्यात आली होती. असे प्रकार क्लेशकारक असल्याची प्रतिक्रिया प्राणीमित्रांकडून व्यक्त होत आहे. प्राणीमात्रांवर होणाऱ्या क्रूरतेला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. प्राणी संवर्धन संघटनांनीही या घटनेचा निषेध केला आहे. जळगाव शहासह जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारची घटना घडत असल्याचे निदर्शनास येत असल्यास प्राणीमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader