जळगाव : केळी पीक आणि व्यवसाय हा जळगाव जिल्ह्याचा आणि त्यातही विशेषतः रावेर, यावल तालुक्यांचा मुख्य कणा आहे. परंतु केळीवरील बंची टॉप, सीएमव्ही, करपा, सिगा टाका हे रोग लक्षात घेता, आता शास्त्रोक्त पद्धतीने केळीचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे, अन्यथा काळाच्या ओघात केळी पीक नष्ट होऊ शकते, असा इशारा केळीतज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी दिला आहे. माजी खासदार तथा आमदार कृषिमित्र स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे मित्रपरिवारातर्फे यावल तालुक्यातील फैजपूर येथे आयोजित केळी परिसंवादात डाॅ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींच्या हस्ते परिसंवादाचे उद्घाटन झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केळी पिकासंदर्भात या परिसंवादातून जो काही अहवाल तयार होईल, त्याला जिल्हा नियोजनमध्ये मांडून त्यावर काम करता येईल, असे नमूद केले. सोलापूर येथील प्रगतिशील शेतकरी किरण डोके यांनी शेती तांत्रिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने केली तर फायद्याची ठरू शकते, हा आपला अनुभव असल्याचे सांगितले. पिकवलेला माल हा निर्यात कसा होईल, याचा विचार करून शेतीचे नियोजन करावे. निर्यातक्षम दर्जाच्या केळी उत्पादनावर भर देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : दुधात भेसळ करणाऱ्यांची धुळ्यात अधिकाऱ्यांना दमदाटी

यावेळी हिरालाल चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. अमोल जावळे यांनी प्रास्ताविकात स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांनी आपल्या भागातील शेतकरी समृद्ध होण्यासाठी केळीसंबंधित जे जे करता येईल, ते ते करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon dr kb patil says banana farms should be managed scientifically css