जळगाव : शहरातील सराफ बाजारात शनिवारच्या तुलनेत सोमवारी ५०६ रुपयांची घट नोंदविण्यात आल्यानंतर सोने दर प्रतितोळा ९१ हजार ६७० रुपयांपर्यंत खाली आले. दरवाढीनंतर उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.
सोने दराने एक एप्रिलला प्रतितोळा ९४ हजार ३४८ रुपयांपर्यंत मजल मारत नवा उच्चांक केला होता. सोने दरातील उच्चांकी दरवाढ कायम राहण्याची शक्यता त्यामुळे व्यक्त होत असताना, प्रत्यक्षात शुक्रवारी तब्बल १०३० रुपयांची घसरण झाल्याने सोने ९४ हजाराच्या खाली आले. दुसऱ्या दिवशी शनिवारी देखील घसरण कायम राहिल्याने सोने दराने ग्राहकांसह व्यापाऱ्यांना दिलासा दिला होता. सोमवारी बाजार उघडल्यावर शनिवारच्या तुलनेत ५०६ रुपयांची घट झाल्याने सोने ९२ हजाराच्या खाली आले. दरम्यान, दर अचानक कमी झाल्यानंतर लग्नसराईच्या खरेदीसाठी सराफ बाजारात आलेल्या ग्राहकांना आर्थिक कुवतीनुसार आता सोने खरेदी करता येत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम सुवर्ण व्यवसायातील उलाढालीवर हळूहळू जाणवू लागला असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
चांदीत घसरणीनंतर किंचित वाढ
जळगावात शुक्रवारी चांदीचे दर ९७ हजार ८५० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यात दुसऱ्या दिवशी शनिवारी पुन्हा ५१५० रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने चांदी प्रतिकिलो ९२ हजार ७०० रुपयांपर्यंत घसरली होती. मात्र, सोमवारी २०६ रुपयांची किरकोळ वाढ नोंदविण्यात आल्यानंतर चांदी ९२ हजार ९०६ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली.