जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेले सोन्याचे भाव सोमवारी ८८ हजार ७८६ रुपये प्रति तोळा या उच्चांकी पातळीवर पोहोचले. रुपयाच्या तुलनेत वधारलेली डॉलरची किंमत आणि चीनकडून अचानक वाढवण्यात आलेल्या खरेदीमुळे सोने दरात वाढ झाल्या निर्माण झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे भाव जीएसटीसह ८७ हजार ७५६ रुपये प्रतितोळा होते. सोमवारी १०३० रुपयांची वाढ झाल्याने दर जीएसटीसह ८८ हजार ७८६ रुपये प्रतितोळ्यापर्यंत पोहोचले. चांदीचे भाव ९७ हजार रुपये किलोप्रमाणे स्थिर होते, त्यात कोणतीच वाढ अथवा घट नोंदवण्यात आली नाही.

जळगावात १८ जानेवारीला सोने ८२ हजार रूपये प्रतितोळा होते. मात्र, तीन आठवड्यांच्या कालावधीनंतर सोन्याचे भाव आता तोळ्यामागे सुमारे साडेसहा हजार रुपयांनी वधारले आहेत. चीनसारख्या देशाने सुमारे ५०० टन सोने खरेदीचे उद्दीष्ट बाळगले असतानाच, त्या देशातील बँकांना राखीव निधीपैकी एक टक्का निधी फक्त सोने खरेदीत गुंतवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे जगभरात सोन्याच्या भावाने अचानक उसळी घेतली आहे. ही वाढ आणखी काही दिवस अशीच कायम राहील, असे सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

सोन्याचे भाव वाढण्यामागे रुपयाच्या तुलनेत वधारलेली डॉलरची किंमत कारणीभूत आहे. दुसरीकडे, चीनने खरेदी वाढवल्यामुळेही जगभरात सोन्याचे भाव अचानक तेजीत आले आहेत.

अजय ललवाणी (अध्यक्ष, सुवर्ण व्यावसायिक संघटना, जळगाव)

Story img Loader