जळगाव : जिल्ह्यातील पारोळा शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवे फाट्यावर दोन भरधाव मोटारींची समोरासमोर धडक झाल्याने सुरत येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. धडक देणाऱ्या मोटारीतील नाशिकचे चार जण जखमी झाले आहेत. सुरत शहरात किराणा व्यवसाय करणारे सुधीर पाटील (४७) हे पत्नी ज्योती (४२) यांच्यासह पारोळा तालुक्यातील लोणी येथे पुतणीच्या लग्न कार्यासाठी मोटारीने येत होते. पारोळा शहर ओलांडून म्हसवे फाट्यावरून लोणीला जाणाऱ्या रस्त्याकडे वळत असतानाच त्यांच्या मोटारीला सोमवारी सायंकाळी जळगावहून पारोळ्याकडे येणाऱ्या भरधाव मोटारीने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, पाटील दाम्पत्याच्या मोटारीचा चुराडा झाला. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. समोरून धडक देणाऱ्या मोटारीतील शिरीष लढ्ढा (४०), उमेश लहाने (४२), चालक प्रवीण तागड आणि मिरज चांदे (सर्व रा.नाशिक) हे जखमी झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा