जळगाव : जातीचे दाखले नोंदींवरून सरसकट मिळावेत आणि जातवैधता प्रमाणपत्र मिळावे यांसह अन्य मागण्यांची शासन-प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे जळगावात आदिवासी कोळी समाजबांधवांनी पुन्हा सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या १२ व्या दिवशी अर्थात मकरसंक्रांतीला चक्क झाडावर चढत लटकून घेत शासन- प्रशासनाचा निषेध केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानजीक अन्नत्याग आंदोलन सुरू असून, पुंडलिक सोनवणे व प्रभाकर कोळी हे उपोषणास बसले आहेत. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी आदिवासी कोळी समाज आंदोलन समन्वय समितीतर्फे प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वात संतप्त समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशाद्वारावरच झोपा काढो आंदोलन केले होते. ११ व्या दिवशी उपोषणकर्ते प्रभाकर कोळी यांची तब्येत खालावली.

हेही वाचा : जानेवारीच्या मध्यावर गारवा, नाशिकमध्ये ११.१ नीचांकी तापमानाची नोंद

उपोषणकर्ते सोनवणे यांनी, जोपर्यंत जिल्ह्यातील आदिवासी टोकरे कोळी समाजबांधवांच्या हाती जातीचा दाखला मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी अर्थात सोमवारी १२ व्या दिवशीही न्याय न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही मंत्री, जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलनस्थळी प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वात समाजबांधवांनी झाडावर चढत लटकून घेतले. या अनोख्या आंदोलनाकडे जळगावकरांचे लक्ष वेधले गेले.

हेही वाचा : नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सुरळीत

प्रा. सोनवणे यांनी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. जर उपोषणकर्त्यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह शासन- प्रशासनास परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनात बबलू सपकाळे, भगवान सोनवणे, शुभम सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, भरत पाटील, अ‍ॅड. गणेश सोनवणे, दीपक सोनवणे व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon koli tribal agitation for caste certificate by hanging on trees css