जळगाव : आमचे सर्वसाधारण मोलमजुरी करणारे कुटुंब असून, माझ्या मुलाला अभ्यासाची गोडी आहे. तो रेल्वे, पोलीस आदी सरकारी नोकरीच्या प्रयत्नात होता. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याची त्याची इच्छा होती. तो देशासोबत कधीच गद्दारी करू शकत नाही. तो या प्रकरणात अडकला आहे. एखाद्या मुलीशी समाजमाध्यमात त्याने संवाद साधला असू शकतो. पण कधीही देशासोबत गद्दारी करू शकत नाही, असे पाकिस्तानी गुप्तहेराला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरविल्याच्या संशयातून महाराष्ट्र दहशतवादविरोधी विभागाच्या पथकाने ठाणे जिल्ह्यात अटक केलेल्या पाचोरा येथील गौरव पाटील याचे वडील अर्जुन पाटील यांनी सांगितले.
मुंबई येथील नौदलातील गोदीत प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून काम करताना पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकांना भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पुरविल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी विभागाच्या पथकाने अटक केलेला गौरव पाटील हा जिल्ह्यातील पाचोरा येथील मूळ रहिवासी असून, त्याचे वडील अर्जुन पाटील हे बांधकामाचा व्यवसाय, तर आई धुणीभांडीचे काम करते. अर्जुन पाटील यांची परिस्थिती सर्वसाधारण असून, त्यांचा लहान मुलगा विवेक ऊर्फ विकी हा शिक्षण घेत आहे. माझा मुलगा निर्दोष आहे. तो अभ्यासात हुशार असून, तो रेल्वे, सैन्यभरती व पोलीस भरतीची तयारी करीत होता. त्याला देशसेवा करावयाची आहे. तो देशाशी गद्दारी कधीच करणार नाही, असे अर्जुन पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा : आग विझविण्यासाठी आता ९० मीटर उंचीची शिडी, नाशिक मनपा सभेत मान्यता
मी बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंग व इतर मजुरीची कामे करतो. पत्नी भांडीधुणीची कामे करते. आई आजारी आहे. लहान मुलाचे शिक्षण सुरू आहे. आमचे साधारण कुटुंब आहे. गौरव हा स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करीत आहे. त्याला विविध पारितोषिके मिळाली आहेत. गौरव हा लहानपासून कष्टाळू आहे. वर्ष-दीड वर्ष त्याने बांधकामाचेही काम केले. त्याच्यासंदर्भात कोणाच्याही काहीही तक्रारी नव्हत्या. लहान मुलांमध्ये खेळत होता. आम्हाला त्याच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर धक्काच बसला. आमचा मुलगा सुखरूप घरी आला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.