जळगाव : मराठा समाजाच्या आरक्षणावरून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात येथे सकल मराठा समाजातर्फे प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. छगन भुजबळांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
भुजबळ हे मराठा समाजाबद्दल अतिशय खालच्या पातळीवर टीका करीत असून, बेछूट आरोप करत आहेत, तसेच मराठा समाजाबद्दल सतत आक्षेपार्ह वक्तव्य करून ओबीसी व मराठा समाज बांधवांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे. शहरातील कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनात लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, सकल मराठा समाजाचे पदाधिकारी प्रमोद पाटील, भीमराव मराठे, सुधीर कोकाटे, संतोष पाटील, अविनाश पाटील, अशोक पाटील आदींनी सहभाग घेतला.
हेही वाचा : नाशिक : विजेच्या धक्क्याने बालिकेचा मृत्यू
हेही वाचा : वीर जवान विनोद पाटील यांना अखेरची मानवंदना, जळगाव जिल्ह्यातील हजारोंची उपस्थिती
यावेळी भुजबळ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. समाजाचे पदाधिकारी सुधीर कोकाटे म्हणाले की, ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून होत असलेल्या सभांतून मंत्री भुजबळ हे पातळी सोडून मराठा समाजावर टीका करीत आहेत. आम्हाला त्यांच्या पक्षाशी, समाजाशी आणि सभांशी काहीएक देणेघेणे नाही. भुजबळ हे ओबीसी आणि मराठा या दोन समाजबांधवांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचे आंदोलन कोणत्याही जाती-समाजाविरोधात नसून, भुजबळ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आहे. भुजबळांनी तत्काळ महाराष्ट्रातील मराठा समाजाची जाहीर मागावी, अशी आमची मागणी आहे. या सरकारमधले जे काही मंत्री आहेत, त्यांचे डोके ठिकाणावर नाही. ते मराठा समाजावर बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांचे आम्ही खंडन करत आहोत. त्यांच्याकडे पुरावे असतील, तर त्यांनी ते सिद्ध करावे. मंत्र्यांचे मराठा आणि ओबीसींमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र असून, ते मराठा समाज हाणून पाडेल, असे कोकाटे यांनी नमूद केले.