जळगाव : महिला संरक्षणात सत्ताधारी सरकार हे अपयशी ठरत आहे. एकट्या बुलढाणा जिल्ह्यात ५५७ मुली बेपत्ता आहेत, यावरून संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती आपण समजू शकतात. महाराष्ट्रात महिला-मुलींवर अत्याचार वाढताना दिसून येत असून, त्या रोखण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेत महिला बचत गटांसंदर्भात प्रदेशाध्यक्षा अॅड. खडसे-खेवलकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सध्या महिला आयोगाच्या अध्यक्षा चित्रा वाघ या बुलडाणा जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत; परंतु त्यांनी बेपत्ता झालेल्या मुलींबाबत चकार शब्दही काढला नाही. यावरून शासन आणि सरकार महिलांबाबत असंवेदनशील आहे, असे दिसून येत असल्याचे खडसे यांनी सांगितले. बेपत्ता ५५ महिला-मुली शोधण्यात पोलिसांना यश आले. मात्र, त्या महिला-मुलींपैकी काहींवर अत्याचार झाले असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : प्राथमिक विभागाला माध्यमिकपेक्षा आठ दिवस अधिक दिवाळी सुट्ट्या

महाराष्ट्रात महिलांवर अन्याय वाढताना दिसून येत असून, या घटना रोखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरले आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी या मुद्यावर भाष्य केले होते. त्यांनी महाराष्ट्रातील १९ हजार महिला बेपत्ता आहेत, असे सांगितले आहे. हा आकडा खूप मोठा आहे. खरे म्हणजे प्रत्येकाला विचार करायला लावणारी ही बाब आहे. मुलगी घराबाहेर पडली असेल, तर ती घरी परत येताना वातावरण सुरक्षित आहे का, ही बाबही पालकांसाठी चिंताजनक आहे. यावर सरकारने तातडीने योग्य ती कारवाई करावी, हीच मागणी असल्याचे त्या म्हणाल्या.

Story img Loader