जळगाव : शहर बससेवेच्या जागेचा शोध आता थांबला असून, जुन्या स्थानकाची जागा शहर बससाठी देण्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे तत्त्वतः मान्यता दिली असल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली. त्याअनुषंगाने आता जुन्या बस स्थानकापासून शहर बससेवा सुरू होणार आहे. त्यासंदर्भातील बसच्या मार्गांचे नियोजनही करण्यात आले आहे. केंद्र सरकारतर्फे पीएम ई-बससेवा योजनेंतर्गत जळगावात शहर बससेवा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतूनच शहरासाठी वातानुकूलित ५० बस मिळणार आहेत.
शहर बससेवा सुरू करण्याबाबत महापालिकेच्या २३ ऑगस्ट रोजी झालेल्या शेवटच्या महासभेत ठराव मंजूर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी शहर बससेवेसंदर्भात प्रक्रिया सुरू केली. महापालिकेतर्फे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे जुन्या स्थानकाच्या जागेची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी महामंडळाकडून नकार देण्यात आला होता. आता मात्र महामंडळाने केवळ बससेवेसाठी जागा देण्यास तत्त्वतः मान्यता दिल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या प्रारुप याद्या प्रसिद्ध
त्यामुळे शहर बससेवेच्या स्थानकाच्या जागेचा प्रश्न सुटला आहे. महापालिकेतर्फे आता शहर बससेवेच्या मार्गांचे नियोजन केले जात आहे. मोठ्या बस महामार्गावर, मध्यम बस शहरातील मुख्य कॉलन्यांसाठी आणि लहान बस कॉलन्यांतर्गत मार्गावर धावणार आहेत. शहर बस इलेक्ट्रिक असतील. त्यांचे चार्जिंग केंद्रही जुन्या बसस्थानकात करण्यात येईल. शहरात इतर ठिकाणीही चार्जिंग केंद्र राहणार आहेत. दहा वर्षांपासून अर्थात नोव्हेंबर २०१४ पासून जळगावकरांची शहर बससेवा बंद होती.