लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वीजचोरी करणाऱ्या भडगाव तालुक्यातील एकाला एक वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. जे. मोहिते यांनी सुनावली.
भडगाव तालुक्यातील डोंगरगाव शिवारात राहणारे पंजाबराव देशमुख यांनी कोंबडी पालनाच्या शेडमध्ये मका दळण्याच्या गिरणीवर महावितरणचे वीजमीटर लावले आहे. या गिरणीवरील वायर कापत त्यातून सुमारे ४४ हजार ३७५ युनिट अर्थात दोन लाख ९३ हजार ७२० रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरणचे सहायक अभियंता अभय पाटील यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
हेही वाचा… लोहमार्ग पोलिसांकडून चोरीसह नऊ गुन्हे उघडकीस; सव्वा चार लाखाहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत
त्यानुसार २९ डिसेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबाबतचा खटला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात सुरू होता. न्या. मोहिते यांनी देशमुख यास दोषी ठरवीत शिक्षा सुनावली. तसेच आरोपीने दोन लाख, ९३ हजार ७२० रुपये महावितरण कंपनीत एक महिन्याच्या आत भरावेत, असा आदेशही दिला आहे.