जळगाव : शहरासह जिल्हाभरात चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिलेले असताना, आता पोलीसही सक्रिय झाले आहेत. जिल्ह्यात तब्बल ३१ घरफोड्यांची उकल करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निवडणुकीत पराभूत झालेल्या सरपंचपदाच्या उमेदवाराच्या मुसक्या आवळल्या. प्रवीण पाटील (३२, बिलवाडी, जि. जळगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याने दोन वर्षांत आतापर्यंत २० घरफोड्या केल्या असून, त्याच्याकडून १७३ ग्रॅम सोने, मोटार व दुचाकी जप्त केली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “…तरच नाशिकचे पाणी जायकवाडीसाठी सोडा”, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात बुधवारी दुपारी एम. राजकुमार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. याप्रसंगी अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील आदी उपस्थित होते. बिलवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीत स्वतंत्र पॅनल करुन सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या प्रवीणचा पराभव झाला. या उमेदवाराने निवडणुकीत चांगलाच पैसा खर्च केला. पैसा खर्च करूनही त्याचा पराभव झाला. मात्र, त्याच्या रुबाबात कोणताही फरक पडला नाही. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला.

हेही वाचा : चोपड्यातील गूळ प्रकल्पग्रस्त आक्रमक, जळगाव तापी पाटबंधारे कार्यालयात झोपा काढो आंदोलन

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील, सहायक निरीक्षक नीलेश राजपूत यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने प्रवीणला ताब्यात घेत ३१ घरफोड्या उघडकीस आणल्या. संशयित प्रवीणला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने २० गुन्ह्यांची कबुली दिली. पथकाने संशयिताकडून १७३ ग्रॅम सोने, मोटार व दुचाकी जप्त केली. पथकाने प्रवीणला तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेऊन हा सर्व प्रताप उघडकीस आणला. संशयिताने जिल्ह्यासह परजिल्ह्यांतही घरफोड्या केल्याची कबुली दिली. प्रवीणने निवडणुकीत केलेला खर्च आणि त्याचा थाटमाट पाहून त्याच्यावर संशय बळावल्यामुळेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon person did burglary to win gram panchayat election lost all stolen money to win the election css