जळगाव : यावल तालुक्यातील डोणगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पहिलीपासून प्रवेश घेतलेल्या मुलांना दहावीत प्रवेश देण्यास संस्थाचालकांनी नकार दिला. त्यामुळे दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांसह पालकांनी गुरुवारी यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात धडक देत कैफियत मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षण संस्थाचालकांना आदिवासी विभागाकडून थकीत देयके मिळाली नाहीत. त्यामुळे संस्थाचालकांनी आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिल्याचे बोलले जात असले, तरी दुसरीकडे पहिलीपासून ज्या शाळेत आदिवासी मुलांनी शिक्षण घेतले, त्याच शाळेत विद्यार्थ्यांना नववी व दहावीमध्ये प्रवेश मिळत नाही. त्यामुळे यात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आणि शिक्षण संस्थाचालक यांच्यात समन्वयाअभावी आदिवासी विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असून, त्यांना शाळेत प्रवेश मिळत नसल्याने पालकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा…नाशिक : पत्नी, सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या

आदिवासी विद्यार्थ्यांना डोणगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश का दिला जात नाही, संस्थाचालकांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकार्‍यांकडे विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याबाबत लेखी पत्र दिले आहे, ते लेखी पत्र संस्थाचालकांनी कोणत्या नियमानुसार दिले, आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेताना विद्यालयाचे तसेच संस्थाचालकांनी घालून दिलेल्या अटी-शर्ती आणि नियमांचे पालन करीत नाही का, आदिवासी विद्यार्थ्यांनी विद्यालयात शिक्षण घेताना किंवा निवासी असताना काही चुकीची वागणूक देऊन संस्थाचालकांच्या शैक्षणिक कामकाजात अडथळा निर्माण केला आहे का, आदी अनेक मुद्दे पुन्हा चर्चिले जात आहेत. याबाबत आदिवासी संघटनांनी डोणगाव येथील शिक्षण संस्था आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी समन्वय साधून आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश कसा मिळेल, याबाबत प्रयत्न केला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा…नाशिक : शहर पोलीस भरतीत पावसाचा व्यत्यय, पहिल्या दिवशी शहरात २१४, ग्रामीण पोलीस दलाच्या प्रक्रियेत ३०५ उमेदवार गैरहजर

डोणगाव येथील शाळेत २०४ आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यंदा संबंधित शाळेकडून लेखी पत्र देण्यात आले असून, पत्रात विद्यार्थ्यांच्या गैरवर्तणुकीसह पालक पाल्यांना दोन-दोन महिने शाळेत पाठवित नसल्याने आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरून शाळेचा नावलौकिक घसरतो, यांसह इतर कारणे पत्रातून दिली आहेत. ते पत्र शासनाकडे पाठविले आहे. दुसर्‍या शाळेत विद्यार्थ्यांना समायोजित करण्यास पालकांना सांगितले. मात्र, पालकांचा याच शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेशाचा अट्टाहास आहे. शासनाकडून पत्राबाबत मार्गदर्शनही मागविले आहे. अजूनही ते प्राप्त झाले नाही. तरीही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. – अरुण पवार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, यावल

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon s yawal taluka parents protest dongaon school s refusal to admit tribal students cite administrative disputes psg
Show comments