जळगाव : पैशांच्या आणि पदाच्या लालसेतून पक्ष सोडून जाणाऱ्यांना जाऊ द्या; खरोखर निष्ठावान असलेला कार्यकर्ता कुठेच जाणार नाही. मात्र, कार्यकर्त्यांना गृहीतही धरू नका, असा इशारा देऊन जळगावमधील शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) मेळाव्यात पक्षाच्या नेत्यांना इतरांनी घरचा आहेर दिला.

विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभव आणि जळगाव जिल्हाप्रमुखपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाल्यानंतर प्रथमच जळगावमध्ये ठाकरे गटाच्या जळगाव जिल्हा पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन रविवारी सायंकाळी करण्यात आले होते. ठाकरे गटाचे उपनेते व जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना नवी उभारी देण्याचा हेतू होता. प्रत्यक्षात जिल्हाप्रमुखांच्या निवडीवेळी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात न घेतल्याने पक्षांतर्गत नाराजी व वादाचे पडसाद मेळाव्यावर पडले.

माजी महापौर जयश्री महाजन, माजी खासदार उन्मेश पाटील, चोपड्याचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांच्यासह पक्षाचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. कुलभूषण पाटील यांच्या जिल्हाप्रमुखपदावरील निवडीला आक्षेप घेऊन नुकतेच राजीनामा देणारे पक्षाचे जुने पदाधिकारी गजानन मालपुरे हे देखील अनुपस्थित होते.

दरम्यान, आंदोलन हे शिवसेनेचे बलस्थान असल्याने भविष्यात पक्ष वाढवायचा असेल तर शेतकरी, महिला, बेरोजगार आणि उद्योजकांसाठी आपल्याला न्याय लढा द्यावा लागेल. त्यादृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवावी लागेल, असा सूर मेळाव्यातून निघाला. यावेळी ठाकरे गटाचे जळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, संघटक करण पवार, महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, वैशाली सूर्यवंशी, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील आदी उपस्थित होते.