जळगाव : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आता अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे पडसाद जळगाव ग्रामीण मतदारसंघात उमटले असून, धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेने (उध्दव ठाकरे) देवकर यांचा विधानसभा निवडणुकीत प्रचार केल्याचा पश्चाताप व्यक्त करत रविवारी आत्मक्लेश आंदोलन केले.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला उमेदवारी मिळणार होती. परंतु, ठाकरे गटाने उमेदवारी शरद पवार गटाला दिली. त्यांच्याकडून गुलाबराव देवकर यांनी निवडणूक लढवली. ठाकरे गटाने जोरदार प्रचार करून त्यांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे देवकर यांना सुमारे ८५ हजारावर मतदान झाले. परंतु, मतदानावेळी बोटाला लावलेली शाई निघण्याच्या आधीच सत्तेच्या लालसेपोटी कोणताही विचार न करता देवकरांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना मतदान केल्याचा पश्चाताप त्यामुळे आता आम्हाला होत आहे, असे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले.
हेही वाचा : १५ कोटी द्या, राज्यपाल करतो…तामिळनाडूतील एकाची कोट्यवधी रुपयांना फसवणूक
आत्मक्लेश आंदोलनात धरणगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख नीलेश चौधरी, जळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, ठाकरे गटाचे उपजिल्हा संघटक ॲड.शरद माळी, तालुका संघटक लीलाधर पाटील, शहर प्रमुख भागवत चौधरी आदी सहभागी झाले होते.