जळगाव: जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील सहावर्षीय बालिकेचा अत्याचार करीत हत्या करणार्‍या संशयिताला पोलिसांनी भुसावळमधून ताब्यात घेतल्यानंतर त्यास आपल्या स्वाधीन करा, अशी मागणी करीत जामनेर शहरात रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक व जाळपोळ करण्याची घटना गुरुवारी रात्री घडली. दगडफेकीत पोलीस निरीक्षकांसह सात कर्मचारी जखमी झाले. घटनेस जबाबदार असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगावच्या जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील सहावर्षीय बालिकेचा अत्याचार करून हत्या केल्याची घटना ११ जूनला समोर आली होती. या प्रकरणातील फरार संशयित सुभाष भिल यास गुरुवारी भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी अटक केली. नंतर त्याला जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, त्याला पोलीस ठाण्यात न नेता आमच्या स्वाधीन करा, अशी मागणी जमावाने केली. त्यानंतर जमाव आक्रमक झाला. त्यांनी पाचोरा, बोदवड आणि जळगाव या रस्त्यांवर रास्ता रोको आंदोलन केले. यात पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांचे वाहनही काही वेळ रोखून धरण्यात आले. आंदोलनामुळे जळगाव, भुसावळ रस्त्यावरील वाहतूकही अडीच तास ठप्प झाली होती. अचानक झालेल्या प्रकारामुळे शहरातील मुख्य भागात धावपळ उडाली. त्यानंतर संतप्त जमावाने थेट पोलीस ठाण्यावर धडक दिली. संशयिताला आमच्या स्वाधीन करा, यासाठी जमावाने पोलिसांशी वाद घातला. त्यानंतर थेट पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक सुरू केली. काही दुचाकींचीही तोडफोड करीत एक दुचाकी जाळून टाकण्यात आली. टायरही पेटविण्यात आले.

हेही वाचा : नाशिक महानगरपालिकेची सिटीलिंक बससेवा पुन्हा विस्कळीत; हजारो विद्यार्थी, प्रवासी वेठीस

दगडफेकीमुळे पोलीस ठाण्याच्या आवारात दगडांचा खच पडला होता. खिडक्यांची तावदानेही फुटली. जीव वाचविण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या कर्मचार्‍यांसह नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी सुरक्षित आश्रय घेतला. याच वेळी गर्दीतून हवेत गोळीबार केल्याचा आवाजही आला. गोळीबार कुणी केला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. वातावरण चिघळत असल्याचे पाहून पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी काही सहकार्‍यांच्या मदतीने जमावावर लाठीमार करून जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने आणखी जोरदार प्रतिहल्ला केला. रात्री उशिरापर्यंत संतप्त जमावाचा धुडगूस सुरू होता.

दगडफेकीत जामनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह रामदास कुंभार, संजय खंडारे, राजू माळी, सुनील राठोड, रमेश कुमावत, प्रीतम बर्कले, नीलेश महाजन, सुनील आमोदकर जखमी झाले. शिंदे यांना जमावाने बेदम मारहाण केली असून, कुमावत यांच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारण्यात आला. त्यामुळे ते रक्तबंबाळ झाले. सुनील राठोड व संजय खंडारे हेही जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातून पोलीस कुमक मागविण्यात आली. हल्लेखोरांमध्ये केवळ जामनेरच नव्हे, तर लगतच्या काही तालुक्यांतून मनुष्यबळ एकवटल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : सरकारी कांदा खरेदी दरात बदल पण, बाजार समितीपेक्षा ते कमीच; नाफेडला कांदा न देण्याचे संघटनेचे आवाहन

दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी येरुळे आदी अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी करीत, जखमी पोलीस कर्मचार्‍यांची विचारपूस केली. आता जामनेर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जामनेरमधील घटनेमुळे व्यथित- महाजन

गुरुवारी रात्री जामनेरमध्ये दिसून आलेला जनतेचा आक्रोश आणि संताप रास्त आहे. कोणत्याही संवेदनशील नागरिकाचा संताप अनावर व्हावा, असेच कुकृत्य संबंधित नराधमाने केले. या दुर्दैवी घटनेमुळे मीदेखील आपल्याइतकाच संतप्त आणि व्यथित आहे; पण कृपया भावनांना आवर घालावा. कोणीही कायदा हातात घेऊ नये. तपास यंत्रणेला त्यांचे काम करू द्यावे. दोषी व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यादृष्टीने काटेकोर तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संकटग्रस्त परिवाराला आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्याचीही सूचना प्रशासनाला केली आहे, असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon stone pelting at jamner police station after murder of a minor girl css