जळगाव : चोरीच्या गुन्ह्यात जळगाव जिल्ह्यातील मारवड येथील पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताने अमळनेर येथील पोलीस ठाण्यातील कोठडीत (लॉकअप) गळफास घेतल्याचे शनिवारी उघड झाले.
अमळनेर तालुक्यातील मारवड येथील पोलीस ठाण्यात २५ फेब्रुवारी रोजी बकरी चोरीच्या दाखल गुन्ह्यात पोलिसांनी संशयित घनश्याम कुमावत (४९, मूळ रा. दोंदवाडे, चोपडा, हल्ली मुक्काम डांगरी, अमळनेर) याला दोन मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर तपासात बकरी चोरी प्रकरणात सहभागही दिसून आला. गुन्ह्यात संशयित कुमावतला अमळनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आल्यावर न्यायालयाने त्याला सहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला मारवड येथील पोलीस ठाण्यातील २९ फेब्रुवारीच्या तार चोरी प्रकरणात दाखल गुन्ह्यात न्यायालयाने नऊ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
हेही वाचा…जळगाव : आता कोंबड्यांच्या झुंजीवरही सट्टा
पोलिसांनी संशयिताला वर्ग केले होते. अमळनेर येथील पोलीस ठाण्यातील कोठडीत असताना शनिवारी सकाळी संशयित शौचाला गेला. शौचालयात संशयिताने चादर फाडत गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही संशयित शौचालयाबाहेर येत नसल्याने सुरक्षारक्षकाने पाहणी केली असता संशयिताने आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडून प्रशासन कामाला लागले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षिका कविता नेरकर यांच्यासह अधिकार्यांनी अमळनेर येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. आत्महत्येचे कारण उशिरापर्यंत कळू शकलेले नाही.