जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा पाडळसरे प्रकल्प २० ते २५ वर्षांपासून अपूर्ण असून, तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी बुधगाव (ता. चोपडा) येथील रहिवासी व पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या तरुण सदस्याने गुडघ्यावर चालून अमळनेर येथील श्री मंगळग्रह देवाला साकडे घातले. यावेळी बैठकीसाठी आलेले मंत्री अनिल पाटील यांना हात जोडत आणि दंडवत घालत त्याने मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याची विनंती केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे तरुण सदस्य उर्वेश साळुंखे यांनी पाडळसरे प्रकल्प पूर्णत्वासाठी शनिवारी अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात गुडघ्यावर चालत साकडे घातले. याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले, पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, रणजित शिंदे, रामराव पवार, हिंमत कखरे, निवृत्त मुख्य कार्यकारी अभियंता अशोक पवार, पाडळसे प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील, नागपूर प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार, उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे कार्यवाह प्रा. विकास पाटील आदींसह पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा : नाशिक : विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

साळुंखे यांनी निम्न तापी पाडळसरे प्रकल्प पूर्ण करावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतःच्या रक्ताच्या शाईने निवेदन तयार केले आहे. ते साळुंखे हे स्वत: मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. यासाठी ते सतत मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील, चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांनाही विनंती अर्ज दिला. मात्र, मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्यासाठी कोणीही लक्ष न देता, शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या पाडळसरे प्रकल्पासाठी राज्यातील सत्ताधारी असलेले जिल्ह्यातील मंत्री, आमदार उदासीन आहेत, असा आरोप साळुंखे यांनी केला आहे. याप्रसंगी माजी आमदार साहेबराव पाटील, स्मिता पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon youth walking on the knee for padalsare project css