जळगाव : यंदा कमी पाऊस, गुलाबी बोंडअळीसह अन्य किडी व रोगांचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे राज्यातील कापसाचे उत्पादन ५० टक्के घटले आहे. यामुळे सद्यःस्थितीत राज्यातील निम्मे जिनिंग उद्योग बंद झाले आहेत. परिणामी आगामी काळातही कापूस दर वाढण्याची शक्यता धूसर आहे. सध्या सूत गिरण्यांकडून कापूस गाठींचा उठाव कमी होत आहे. सरकीचेही भाव कमी झाले. बांगलादेश, इंडोनेशिया, चीन, व्हिएतनाम या बाजारपेठेतूनही कापसाला मागणी होत नसल्याने दर कमी झाल्याचे सांगण्यात येते. भारतासह जागतिक उत्पादन, वापर आणि व्यापाराचा अंदाज महिन्याच्या शेवटी येणार असला, तरी सध्या कापसाचा पुरवठा कमी आहे. राज्यात ९०० पेक्षा अधिक, तर जळगाव जिल्ह्यात १५० जिनिंग-प्रेसिंग उद्योग आहेत. सद्यःस्थितीत कापसाचे उत्पादन घटल्यामुळे आणि शेतकर्यांकडून कापूस येत नसल्यामुळे राज्यातील ५० टक्के जिनिंग बंदावस्थेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खान्देशातील जळगाव जिल्हा पांढरे सोने असलेल्या कापसाचे आगार म्हणून ओळखला जातो. मागील हंगामात सुरुवातीला कापसाला प्रतिक्विंटल १० ते १२ हजारांपर्यंत भाव मिळाला. त्यानंतर भाव घसरुन ६,५०० रुपयांपर्यंत आले. भाववाढीच्या आशेने शेतकर्यांनी कापूस घरातच ठेवला. मात्र, त्यांची आशा फोल ठरली. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ९५ टक्के अर्थात सात लाख ३८ हजार ५२० हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या. त्यात कपाशीची सर्वाधिक पाच लाख ५८ हजार ७८० हेक्टर क्षेत्रात लागवड झाली होती. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत ४० ते ४५ दिवस पिकाला पोषक पाऊस पडला नाही. शिवाय, गुलाबी बोंडअळीसह अन्य किडी व रोगांचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे उत्पादकतेसोबतच गुणवत्तेतही घट झाली.

हेही वाचा : नाशिक: महापालिकेची फसवणूक प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्याविरुध्द गुन्हा

यंदाचा केंद्र सरकारकडून कापसाचा हमीभाव सात हजार २० रुपये ठरविण्यात आला असताना सध्या नव्या कापसाला देशातील बाजारात सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. सर्वच कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत नसून, ओलावा आणि काडी कचरा जास्त असलेल्या कापसाला बोली कमी लागत असल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे. चांगल्या प्रतीच्या नव्या कापसाला सरासरी ६,५०० ते ७,००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

हेही वाचा : नाशिक वेशीजवळ बिऱ्हाड मोर्चाचा विसावा, उपमुख्यमंत्र्यांशी शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा

“अमेरिका, चीन, ब्राझील या कापूस उत्पादक प्रमुख देशांत बिकट परिस्थिती आहे. चीनमध्ये कापसाचे उत्पादन कमीच आहे. यंदा राज्यात कापसाचे उत्पादन ५० ते ६० टक्के घटले आहे. जळगाव जिल्ह्यात १५० जिनिंग उद्योग असून, निम्मे बंदावस्थेत आहेत. जागतिक बाजारपेठेतूनच कापसाची मागणी होत नसल्याची स्थिती आहे.” – अरविंद जैन (उपाध्यक्ष, खान्देश जिनिंग-प्रेसिंग असोसिएशन)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra half of the ginning industries shut down as cotton production and demand from foreign decreased css