मालेगाव : वीज ग्राहक बचाव समितीतर्फे येथे सुरु करण्यात आलेल्या स्मार्ट मीटर हटाव आंदोलनाचा भाग म्हणून शहरात जनजागृतीसाठी रथ तयार करण्यात आला असून रथाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

वीज अधिनियमानुसार स्मार्ट मीटर बसविणे किंवा न बसविणे हा सर्वस्वी ग्राहकाचा अधिकार असताना महावितरण कंपनीकडून परस्पर स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय ग्राहकांच्या हिताविरोधी आणि गैरसोयीला निमंत्रण देणारा असल्याची तक्रार करुन प्रीपेड मीटरला विरोध करण्यासाठी समितीतर्फे लढा देण्यात येत आहे. त्यानुसार या मीटरविरोधात जनजागृती करण्यासाठी रथ तयार करण्यात आला आहे. यानिमित्ताने समितीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन स्मार्ट मीटर विरोधात हरकती नोंदवून घेणार आहेत.

हेही वाचा…आरोपांमुळे नाशिक शिक्षक मतदार याद्यांची फेरपडताळणी

संपूर्ण मालेगाव शहरात हा रथ फिरवला जाणार असून किमान एक लाख ग्राहकांच्या हरकती नोंदवून त्या मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहेत. जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखविण्याप्रसंगी समितीचे आर. के. बच्छाव, राजाराम जाधव, प्रमोद शुक्ला, कैलास तिसगे, राकेश भामरे, दिनेश ठाकरे उपस्थित होते. सागर पाटील यांनी रथ काढण्यामागील भूमिका मांडली. यावेळी समितीचे क्रांती पाटील, बिपिन बच्छाव, दिनेश पाटील, अनंत भोसले, मयूर वांद्रे, मनोज जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.