नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर, नाशिक ग्रामीण पोलिसांनी मालेगाव तालुक्यात चार गावठी बंदुका, ३१ जिवंत काडतुसे, दोन तलवारी असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना धुळे- मालेगाव महामार्गाने एका मोटारीतून काही संशयित शस्त्रसाठा घेऊन मालेगावच्या दिशेने येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने चाळीसगाव फाटा, सायने शिवारात सापळा रचला. संशयित मोटार आल्यावर ती थांबविण्यात आली. मोटारीतील दोन जणांची झडती घेतली असता दोन देशी बंदुका, २७ जिवंत काडतुसे, दोन चॉपर असा शस्त्रसाठा आढळला. ताब्यात घेतलेले शाकीर पठाण (३४, रा. उत्तमनगर), मोहम्मद सय्यद (२९, रा. नानावली) हे दोघे नाशिकमधील आहेत. दोघांनी संगनमत करत जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अवैधरित्या शस्त्रे बाळगत असल्याची कबुली दिली. दोघेही सराईत गुन्हेगार असून नाशिक शहरातील भद्रकाली, आडगाव, नाशिक ग्रामीण हद्दीतील घोटी, वाडीवऱ्हे, धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपातील गुन्हे त्यांच्याविरुध्द दाखल आहेत.
हेही वाचा:जे. पी. गावित चार कोटींचे धनी, सहा महिन्यांत २५ लाखांपेक्षा अधिकची भर
मालेगाव शहर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने मालेगाव शहरातील कालीकु्ट्टी परिसरात मोमीन अहमद (२३, रा. हजारखोली) यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक गावठी बंदूक आणि जिवंत काडतुसे मिळून आले. त्याच्याविरूध्द मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीतील मोहम्मद लुकमान उर्फ डाबली (२४, रा. गोल्डन नगर) हा तलवार बाळगताना आढळल्याने त्याच्याविरूध्द पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच नाशिक ग्रामीण आणि मालेगाव विभागात मद्याची अवैध विक्री, वाहतूक तसेच हातभट्टीची गावठी दारू तयार करणाऱ्या ४३ जणांविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून ४३ गुन्हे दाखल करण्यात आले. मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत दोन गावठी बंदुका, २७ जिवंत काडतुसे, दोन चाॅपर असा अवैध शस्त्रसाठा पकडला गेला. तपासी पथकाला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.