मालेगाव : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी १७८ कोटींचा घोटाळा केल्याची बातमी प्रसिध्द केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात येथील न्यायालयात बदनामीचा खटला दाखल करण्यात आला आहे. भुसे यांनी हा फौजदारी खटला दाखल केला असून २३ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश राऊत यांना देण्यात आले आहेत.
लिलावात निघालेला तालुक्यातील दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखाना खरेदीच्या नावाने शेतकऱ्यांकडून शेअर्स गोळा करून पालकमंत्री भुसे यांनी घोटाळा केल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला होता. भुसे यांनी याव्दारे १७८ कोटींची माया जमविल्याचा राऊत यांचा दावा होता. राऊत यांच्या बातमीमुळे आपली बदनामी झाली, असा आक्षेप घेत भुसे यांनी ॲड. सुधीर अक्कर यांच्यामार्फत राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.
हेही वाचा : नाशिकमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर कांदे, टोमॅटोफेक
राऊत यांनी नोटिशीला कोणतेही उत्तर न दिल्याने भुसे यांनी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तेजवंतसिंग संधू यांच्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. या खटल्याच्या प्राथमिक चौकशीत तक्रारदार भुसे यांच्या नावलौकिकाला बाधा येईल, या हेतूने सामना वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचा निष्कर्ष न्या. संधू यांनी काढला. त्यानुसार राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासंबंधीचा आदेश शनिवारी न्यायालयाने दिला. राऊत यांना न्यायालयासमक्ष हजर राहून याप्रकरणी खुलासा करण्यासही बजावण्यात आले आहे.