नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरासह इतर तालुक्यांमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी गुन्ह्यांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर मालेगाव पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीच्या १३ दुचाकी हस्तगत केल्या.
मालेगावचे अपर अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग तेगबीर संधु, उपविभागीय अधिकारी कॅम्प विभाग सूरज गुंजाळ यांनी मालेगावातील मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांतील संशयितांच्या सध्याच्या वास्तव्याविषयी माहिती घेवून स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे मालेगाव शहरातील मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतरपणे तपास करत असताना त्यांना मालेगाव शहरातील आयुबी चौक परिसरात काही संशयित चोरीच्या मोटर सायकली विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने आयुबी चौक परिसरात सापळा रचून संशयित इकलाख अहमद ( २३, इस्लामाबाद, रविवार वाॅर्ड, मालेगाव) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांविषयी चौकशी केली असता त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याने जहिर अब्दुल (रा. संगमेश्वर, मालेगाव) यासह दुचाकी सौंदाणे येथून चोरल्याची कबुली दिली. मालेगाव शहर, सटाणा, चांदवड, येवला, जळगाव, नाशिक शहर येथूनही एकूण १३ मोटर सायकली चोरल्याचे त्याने सांगितले.
हेही वाचा… नाशिक : ग्रामपंचायत सदस्य लाच स्वीकारताना ताब्यात;‘पीएमश्री’ निधीच्या कामात अडथळे न आणण्यासाठी पैसे
हेही वाचा… नाशिक : ‘आप’चे मनपासमोर बोंबाबोंब आंदोलन
संशयिताच्या ताब्यातून एकूण १३ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयिताने कबुली दिल्यामुळे मालेगाव तालुका, सटाणा, वांदवड, येवला तालुका, मालेगाव छावणी, जळगाव जिल्हापेठ, भद्रकाली पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटर सायकल चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्ह्यांतील संशयितांकडून दुचाकी खरेदी करणारे निसार हुसेन (रा. देवीचा मळा, मालेगाव), मुजिब अहमद (रा. संगमेश्वर, मालेगाव), फरहान अहमद (रा. मरिमाता मंदिरासमोर, मालेगाव), शोएब अजहर (रा. टेंशन चौक, मालेगाव), मोहंमद इद्रिस (रा. नयापुरा, काबूल चौक, मालेगाव), भिकन पिंजारी (रा. देवीचा मळा, मालेगाव) यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांविरुध्द मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इकलाखचा साथीदार जहिर अब्दुल हा फरार आहे. संशयितांकडून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.