नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी आणि त्यांचे पालक के. सी. पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या डमी अर्जावर भाजपच्या उमेदवार खासदार डॉ. हिना गावित यांनी हरकत घेतल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा खत्री यांनी वकिलांना अर्ध्या तासाची मुदत दिली असून त्यानंतर सुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता हरकतींबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी १८ उमेदवारांकडून ३१ अर्ज दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी दालनात अर्ज छाननी प्रक्रियेला सुरुवात होताच. भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी आणि काँग्रेसचे डमी अर्ज भरलेले के. सी. पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या अर्जांवर हरकती घेतल्या. याबाबत वकिलांना बाजू मांडण्यासाठी अर्ध्या तासांची मुदत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती.
हेही वाचा…नाशिक जिल्ह्यात आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया
गोवाल पाडवी यांनी आपल्या उमेदवारी अर्जात चुकीची आणि खोटी माहिती नमूद करुन अर्जात बंधनकारक असलेल्या बाबी देखील भरल्या नाहीत. तसेच अवलंबित या कलमात खोटी दिशाभूल करणारी माहिती भरल्याचा मुख्य आक्षेप भाजपकडून घेण्यात आला आहे. गोवाल यांच्या अर्जात वडील के. सी. पाडवी, आई हेमलता पाडवी आणि बहीण आदिमा पाडवी यांना अवलंबीत दाखविण्यात आले आहे. तसेच के. सी. पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या अर्जात गोवाल यांना अवलंबित दाखविण्यात आले आहे. त्यामुळे ही माहिती दिशाभूल करणारी आहे.
हेही वाचा…राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे यांचे अर्ज सोमवारी; महायुतीचा नाशिकमध्ये उमेदवार ठरेना
तसेच. गोवाल यांनी आपल्या अर्जात वारस प्राप्त मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. परंतु, त्या मालमत्तेचे विवरण दिलेले नाही. हेमलता पाडवी आणि आदिमा पाडवी यांच्या सध्याच्या बँकेचे ९० दिवसांचे विवरण देखील देण्यात आलेले नाही. के. सी. पाडवी यांचे मालमत्ता मूल्यदेखील कमी दाखविण्यात आल्याची हरकत भाजपकडून घेण्यात आली आहे. सध्या गोवाल आणि हिना गावित यांच्या वकिलांचा निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा खत्री यांच्यासमोर युक्तीवाद सुरु आहे. के.सी. पाडवी देखील संबंधित ठिकाणी दाखल झाले आहेत.