नंदुरबार : तोरणमाळ पर्यटन महोत्सवाच्या व्यासपीठावरुन आपल्या भाषणाचा समारोप करतांना आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडून जय हिंद, जय राष्ट्रवादी असा नारा दिला गेल्याने उपस्थित अवाक झाले. गडबड लक्षात येताच डाॅ. गावित यांनी तत्काळ सावरत ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ म्हणत वेळ निभावून नेली. बोलण्याच्या ओघात अनावधानाने घडलेल्या या प्रकाराची चित्रफित समाजमाध्यमात पसरल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पूर्वीश्रमीचे राष्ट्रवादीचे मंत्री डॉ. गावित हे दशकभरापासून भाजपमध्ये आहेत. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजप या नव्या पक्षात ते रुळले. मागील दोन निवडणुका त्यांनी भाजपच्या तिकीटावर जिंकल्या. परंतु, त्यांना अद्याप राष्ट्रवादीची आठवण येते की काय, अशी साशंकता या निमित्ताने उपस्थितांमधून व्यक्त झाली. तोरणमाळ महोत्सवाच्या कार्यक्रमाचे डॉ. गावित यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावरुन बोलताना त्यांनी आदिवासी विकासच्या माध्यमातून वन विभाग आणि पर्यटन विभागाच्या मदतीने तोरणमाळचा पर्यटन स्थळाच्या दृष्टीने कसा कायापालट होईल हे मांडले.
हेही वाचा : तोरणमाळमध्ये वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या संधी, आदिवासी महोत्सवात डाॅ. विजयकुमार गावित यांचे प्रतिपादन
भाषण संपवताना त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ ऐवजी ‘जय हिंद, जय राष्ट्रवादी’, असा नारा दिला. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. भाषणाच्या ओघात अनावधानाने बोलल्या गेलेल्या जय राष्ट्रवादीची त्यांनी क्षणार्धात दुरुस्ती केली. मात्र या विधानाने उलटसुलट चर्चा सुरू झाली. कधीकाळी राष्ट्रवादीत राहिलेले डॉ. विजयकुमार गावित घरवापसी करतात की काय, या चर्चेला उधाण आले आहे. डॉ. गावित यांची कन्या डॉ. हिना गावित या भाजपच्या खासदार आहेत तर दुसरी कन्या डॉ. सुप्रिया गावित या जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत.