नंदुरबार: जमिनीच्या पोटात अनेक आश्चर्य दडलेली आहेत, असे म्हणतात. त्यांचा केव्हां, कोणाला अनुभव येईल हे सांगता येत नाही. तीन, चार दिवसांच्या संततधार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला या आश्चर्याचा अनुभव घेता आला. नंदुरबार जिल्ह्यात तीन ते चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले वाहू लागले. तलावांसह लघु, मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागले. विहिरींनाही पाणी उतरल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली. काही ठिकाणी तर, पावसाने आता आवरावे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संततधार पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी गावात गुरुवारी चमत्कार घडला. २० वर्षांपासून बंद पडलेल्या एका शेतातील कूपनलिकेतून चक्क ६० फुटापर्यंत आकाशात पाण्याचे फवारे उडाले. मधुकर सावंत या शेतकऱ्याच्या बंद कूपनलिकेच्या बाबतीत हा चमत्कार घडला. प्रारंभी या कूपनलिकेतून मोठा आवाज आला. त्यानंतर अचानक पाण्याचा मोठा फवारा आकाशात फेकला गेला.

हेही वाचा : पेसा कायद्यांतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत नोकरीचे आदेश – आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास स्थगित

सुमारे अर्धा तास ६० फुटापर्यंत आकाशात पाण्याचा फवारा उडत होता. यानंतर पाण्याचा दाब कमी झाला. परंतु, कूपनलिकेतून मोठ्या प्रमाणावर पाणी येणे सुरुच राहिल्याने शेतकऱ्यांनी नाईलाजाने कूपनलिकेवर दगड ठेवून पाण्याचा प्रवाह बंद केला.

कूपनलिकेतून निघणारे पाणी शेतात साचून पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने कूपनलिकेतून येणारे पाणी बंद केले. परंतु, तब्बल २० वर्षांपासून बंद असलेल्या कूपनलिकेतून अचानक आलेल्या या पाण्याची चर्चा सर्वत्र होत आहे. जमिनीच्या पोटातील हे एक आश्चर्य असल्याचे मानले जात आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nandurbar district 60 feet high spray of water in a farm due to heavy rains css