नंदुरबार : राज्यात सिकलसेलचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात या रोगावरील औषध खरेदी वर्षभरापासून रखडली आहे. मार्च २०२४ मध्ये औषध खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीने एक कोटी २८ लाख रुपयांचा निधी दिला. परंतु, तो वर्षभरापासून विनाखर्च पडून असल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची उदासीनता रुग्णांच्या मुळावर उठणारी आहे.
नंदुरबार हा आकांक्षीत जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील कुपोषण आणि सिकलसेल हे आजार आरोग्य यंत्रणेसमोरील सर्वात मोठे आव्हान मानले जाते. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या दप्तरी अवघ्या १३२२ सिकललेस रुग्णांची नोंद आहे. परंतु, गेल्यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात आर्म फोर्स मेडिकल कॉलेज यांनी राबविलेल्या मोहिमेतंर्गत तपासणीत २० टक्के नागरिक सिकलसेलग्रस्त असल्याचे आढळून आले होते. त्यांनी जिल्ह्यातील तीन लाख ४२ हजार ९७२ लोकांची तपासणी केली होती.
हे ही वाचा… आदिवासी विद्यार्थिनींना वेदनाशामक बॅगांचे वाटप
सिकलसेलवर प्रभावी असणारे हायड्रॉक्साईड हे औषध केवळ ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांमधूनच रुग्णांना दिले जाते. या औषधाचा पुरवठा ग्रामीण भागातील तळागाळापर्यत होण्यासाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये जिल्हा नियोजन समितीने सुमारे एक कोटी २८ लाख रुपये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला मंजूर केले होते. प्रशासकीय मान्यता घेवून निधी तातडीने वर्ग देखील करण्यात आला होता. परंतु, वर्ष होत आले असतानाही तांत्रीक बाबीत हा निधी अडकल्याने सिकलसेलची औषध खरेदी होऊ शकली नसल्याचे उघड झाले आहे.
हे ही वाचा… उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
काही तांत्रिक बाबींमुळे निधी खर्च झालेला नाही. मात्र, अत्यावश्यक सुविधांची कमतरता होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने १० लाख रुपये निधीला मान्यता घेण्यात आली. या निधीतून सिकलसेलग्रस्तांसाठी औषध खरेदी करण्यात आली आहे. – रवींद्र सोनवणे (जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार)