नंदुरबार : एकीकडे शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना, दुसरीकडे राज्य सरकारच्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आंतरराष्ट्रीय शाळा १० ते १२ दिवस विद्यार्थ्यांविना ओस पडल्याचे उघड झाले आहे. अशीच काहीशी स्थिती आदिवासी विकास विभागाच्या तोरणमाळ आश्रमशाळेची असून याठिकाणीही विद्यार्थ्यांविना थेट आश्रमशाळेला कुलूप लावण्याची वेळ आल्याने ऐन परीक्षांच्या तोंडावर तोरणमाळ खोऱ्यात शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिक्षण विभागाने मोठा गाजावाजा करुन राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे पहिली आंतरराष्ट्रीय निवासी शाळा सुरु केली. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी निवासी आंतरराष्ट्रीय शाळेत तोरणमाळ खोऱ्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळपास २० शाळांचे समायोजन त्यासाठी करण्यात आले आहे.महाशिवरात्रीपासून शासनाने कुठलीही सुट्टी जाहीर केली नसतानाही एक हजार ६५० क्षमता असलेल्या या शाळेत १० दिवसांपासून एकही विद्यार्थी उपस्थित नसल्याचे चित्र आहे. वर्गात शिक्षक असूनही विद्यार्थीच नाहीत, अशी स्थिती आहे.

हेही वाचा…पाण्याचे दुर्भिक्ष, घटत्या लपण क्षेत्राने बिबट्या वारंवार नाशिक शहरात

याची प्रचिती तोरणमाळ दौऱ्यावर असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनाही आली. त्यांनी शाळेला भेट दिल्यानंतर सर्व सावळागोंधळ उघड झाला. त्यामुळे त्यांनी शिक्षकांना वेतनवाढ रोखण्याची तंबी दिल्यानंतर शिक्षक आता वाड्या, पाड्यांवर विद्यार्थ्यांची शोधाशोध करत असून त्यांचे पालकच शाळेत पाठवत नसल्याचा दावा शिक्षकांकडून केला जात आहे. आता पाडा भेटीतून पालकांचे प्रबोधन करुन विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याची कसरत शिक्षकांना करावी लागत आहे.

तोरणमाळमधील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. याठिकाणी १० दिवसांपासून विद्यार्थी नसल्याने शाळेला कुलूप लावल्याचे दिसून आले. विद्यार्थी नसल्याने चार-पाच शिक्षक वगळता इतर शिक्षकही सुट्यांचा आनंद घेत असल्याचे आढळले. तोरणमाळेच्या याच शाळेत झापी आणि सिंदीदिगर येथील आश्रमशाळाही भरवली जाते. तीनही शाळांच्या ३५ पैकी चार ते पाच शिक्षकांची उपस्थिती बरेच काही सांगून जाते.

हेही वाचा…नाशिकमध्ये मराठी विरुद्ध अमराठी, व्यावसायिकांमध्ये धुसफूस, वादात मनसेची उडी

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून या प्रकाराची दखल घेत आंतरराष्ट्रीय शाळेतील ५८ कर्मचाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षण विभाग अथवा आदिवासी विकास विभाग यांच्याकडून सुट्यांसंदर्भात कुठलेही परिपत्रक नसतानाही निवासी आश्रमशाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सोडलेच कसे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा…धुळे : बालिकेच्या मृत्युनंतर नाल्यात प्रेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

तोरणमाळ येथे महाशिवरात्रीनिमित्ताने जत्रा भरते. त्यासाठी पालक बळजबरीने विद्यार्थ्यांना शाळेतून घेवून गेले. जत्रा झाल्यानंतरही विद्यार्थी अद्याप परत न आल्याने शाळा ओस पडली आहे.– मुख्याध्यापक (भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी निवासी आंतरराष्ट्रीय शाळा, तोरणमाळ)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nandurbar near toranmal zp s international boarding school students went to home for mahashivratri did not come school yet psg