नंदुरबार : आदिवासी समाजातील लग्नांमधील काही अनिष्ट चालीरीती मोडीत काढण्यासाठी धडगाव येथे आयोजित सातपुडा आदिवासी परिवर्तन मेळाव्यात दहेजची रक्कम ५१ हजारपेक्षा अधिक न घेण्यासह अनेक विधायक ठराव करण्यात आले. महिलांच्या सन्मानार्थ हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे जाणीवपूर्वक ठसविण्यात आले. धडगाव तालुक्यातील तोरणमाळ ते अक्कलकुवा तालुक्यातील होराफळी, वडफळी आणि गुजरातमधील मालसामटपर्यंत मोठ्या प्रमाणात आदिवासी भिल्ल समाजाचे वास्तव्य आहे. या समाजात काही वर्षांपासून अनिष्ट परंपरांनी शिरकाव केल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी याहा मोगी माता आदिवासी परिवर्तन मंडळाने ठिकठिकाणी सभा घेऊन प्रारंभी जनजागृती केली. त्यानंतर धडगाव येथील सातपुडा आदिवासी परिवर्तन मेळाव्यात काही निर्णय घेण्यात आले.
भिल्ल समाजातील लग्नात मुलाकडून मुलीला ठराविक रक्कम दिली जाते. या रकमेस हुंडा न म्हणता दहेज असे म्हटले जाते. मुलीच्या सन्मानार्थ दहेज देण्यात येत असल्याचे समाजाचे म्हणणे आहे. काही वर्षात दहेजच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने समाजातील नेत्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळेच मेळाव्यात दहेजची रक्कम ५१ हजारपेक्षा अधिक न घेण्याचा निर्णय मंजूर करण्यात आल्याचे याहा मोगी माता परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रतन पाडवी यांनी सांगितले.
हेही वाचा : बांगलादेशला ५० हजार तर, यूएईला १४,४०० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी
जिल्हा परिषद सदस्य तथा याहा मोगी माता परिवर्तन मंडळाचे सल्लागार विजयसिंग पराडके यांनी, मेळाव्यात घेण्यात आलेले सर्व निर्णय, ठराव समाजातील प्रत्येकास बंधनकारक राहतील, असे नमूद केले. आदिवासींसंदर्भात देशात अंगावर शहारे आणणाऱ्या घटना घडत आहेत. मणिपूरमधील घटनेपाठोपाठ मध्य प्रदेशातील लघूशंका प्रकरण, पालघरमध्ये बळजबरीने घरे उठविणे, मोबदलाविना जमिनी बळकावणे अशा प्रकरणांना सातत्याने सामोरे जावे लागत असल्याचे रतन पाडवी यांनी सांगितले. भारतीय आदिवासी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड.अभिजित वसावे यांनी, दहेज हा मुलींचा सन्मान करतो, तर हुंडा हा मुलींचा छळ करतो, असा युक्तिवाद केला. मेळाव्यात मंडळाचे उपाध्यक्ष शिवाजी पराडके, फेंदा पावरा, सुशिला पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा : विक्षिप्त व्यक्तीच्या दूरध्वनीने नाशिक पोलिसांची धावपळ
मेळाव्यास मंडळाचे उपाध्यक्ष शिवाजी पराडके, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप वळवी, डॉ. दिलवरसिंग वसावे, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पोपटा वसावे, रमेश पाडवी, सरपंच कुवलीबाई पाडवी आदी उपस्थित होते. “आदिवासींच्या समस्यांमध्ये मोठी भर पडत असून आज समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजेच अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मान अबाधित ठेवण्यासाठी आज सामाजिक एकजूट ठेवणे आवश्यक झाले आहे.” – रतन पाडवी (सामाजिक कार्यकर्ते तथा अध्यक्ष, याहा मोगी माता परिवर्तन मंडळ)
हेही वाचा : तहानलेल्या बिबट्याने हंड्यात मान टाकली आणि पुढे…
सातपुडा आदिवासी परिवर्तन मेळाव्यातील ठराव
लग्नात केवळ आदिवासी वाद्यांचाच वापर् करणे, लग्नात बॅण्ड, आवाजाच्या भिंतींचा वापर केल्यास ५० हजार रुपये दंड, वधूला वराकडील वऱ्हाडींबरोबरच सासरी पाठवणे, वधूला वराकडून चांदीची साखळी, काळ्या मणीची पोत (मंगळसूत्र) आणि साडी-चोळी देणे, ५१ हजारपेक्षा अधिक दहेज घेणाऱ्या आणि देणाऱ्या मंडळींना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड, लग्नात आहेर घेण्यास सकाळी नऊपासून सुरुवात करणे, पत्नी असताना पुन्हा तरुण मुलीशी लग्न केल्यास एक लाखाचा दंड (दहेज वगळता), पत्नी असतानाच एखाद्या विवाहितेशी लग्न केल्यास एक लाखाचा दंड आणि विवाहितेच्या पहिल्या पतीला संपूर्ण खर्च परत करणे.