नंदुरबार : शहरालगत असलेल्या होळ शिवारातील द्वारका नगरात बांधकाम सुरू असलेल्या घरासाठी तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन मुलांचा मृत्यू झाला. राजेश्वरी पावरा (सात वर्षे) आणि शंकर पावरा (पाच वर्षे) अशी मयत मुलांची नावे आहेत. त्यांचे वडील घटनास्थळासमोर सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारपासून राजेश्वरी आणि शंकर बेपत्ता होते. कुटूंबियांनी परिसरात शोध घेऊनही दोघे आढळून न आल्याने त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
हेही वाचा : तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा
तक्रारीवरुन पोलिसांनी बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल केला होता. राजेश्वरी आणि शंकर हे दोघेही बुधवारी द्वारका नगरात बांधकाम सुरू असलेल्या घरासाठी तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळून आले. या ठिकाणी खेळतांना पाय घसरुन दोघे टाकीत पडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली. पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
© The Indian Express (P) Ltd