नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे ८५ वर्षावरील ज्येष्ठ मतदार आणि अपंग व्यक्तींच्या घरबसल्या मतदानास सुरुवात झाली आहे. गृह मतदानाचा पर्याय वैकल्पिक स्वरुपाचा होता. अशा संवर्गातील जिल्ह्यात ८५ हजारहून अधिक मतदार असताना केवळ २४४९ मतदार घरबसल्या मतदान करणार आहेत. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून हे अर्ज अनेक घरांमध्ये न पोहोचल्याने हजारो ज्येष्ठांसह अपंगांना या मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही ८५ वर्षावरील व्यक्ती आणि अपंग व्यक्ती ज्या मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकत नाहीत, त्यांना घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. असे जिल्ह्यात ८५ हजारहून अधिक मतदार असले तरी ही सुविधा केवळ २४४९ मतदारांना मिळणार आहे. संंबंधितांच्या घरी जाऊन टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करून घेतले जात आहे. घरबसल्या मतदान करणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. मतदान केंद्रांवर येऊ न शकणाऱ्या पात्र मतदारांना ही सुविधा मिळणार होती. निवडणूक यंत्रणेने प्रारंभी संबंधितांच्या घरी यासंंबंधीचे १२ ड अर्ज पोहचविला जाणार असल्याचे जाहीर केले होते. नंतर मात्र आपल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी (बीएलओ) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. अनेक ज्येष्ठांना संबंधितांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळाला नाही. संकेतस्थळावरून तो शोधणे त्यांच्यासाठी अवघड ठरले. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी हा अर्ज घरपोच देण्याचे कष्ट घेतले नाही. याची परिणती घरबसल्या मतदान करू इच्छिणाऱ्यांची संख्या कमालीची घटण्यात झाल्याची ज्येष्ठांची तक्रार आहे.
हेही वाचा : Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
गृह मतदान करु इच्छिणाऱ्यांची संख्या इतकी कमी होण्यामागे संबंधितांना प्रत्यक्ष मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याची इच्छा असावी असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. विहित मुदतीत ज्यांनी अर्ज भरले, त्यांच्यासाठी गृह मतदानाची व्यवस्था करण्यात आली. मतदानासाठी प्रत्यक्ष केंद्रांवर येणाऱ्या ज्येष्ठ नागरीक व अपंग मतदारांसाठी खुर्ची तसेच तत्सम सुविधा पुरविण्याची सूचना जिल्हा परिषद व महापालिकेला करण्यात आल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.
८३ हजार मतदारांचा नकार कसा ?
जिल्हा निवडणूक शाखेच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात २५ हजार ७४ अपंग मतदार आहेत तर ८५ वर्षावरील मतदारांची संख्या ६० हजार ५४६ इतकी आहे. म्हणजे एकूण ८५ हजार ६२० मतदारांना गृह मतदानाच्या सुविधेचा लाभ मिळणार होता. यासाठीचे १२ ड अर्ज घरोघरी वितरित न झाल्यामुळे अनेकांना या सुविधेपासून वंचित रहावे लागले. ८५ वर्षावरील ज्येष्ठ आणि अपंग अशा एकूण ८३ हजार १७१ जणांनी हे अर्ज भरले नाहीत. म्हणजे त्यांनी घरबसल्या मतदानास नकार दिल्याचा अर्थ प्रशासकीय पातळीवर काढला जात आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक यंंत्रणेकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. ज्येष्ठ व अपंगांना घरबसल्या मतदान करता यावे म्हणून १२ ड अर्जांचे जाहीर केल्यानुसार घरोघरी वाटप होणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नसल्याने गृह मतदानाचे प्रमाण लक्षणीय घटल्याचे दिसत आहे.