नाशिक : केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना (पीएम स्वनिधी) योजनेंतर्गत शहरात तीन टप्प्यात आतापर्यंत एकूण २७ हजार १९२ पथ विक्रेत्यांना ३४ कोटी ६२ लाख रुपयांचे कर्ज बँकांमार्फत वितरित करण्यात आले आहे. या योजनेसह समृध्दी योजनांचा पथ विक्रेत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

शहरी फेरीवाल्यांसाठी पीएम स्वनिधी योजना राबविली जात आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रथम १० हजाराचे कर्ज पथ विक्रेत्यांना देण्यात आले. त्याचा शहरातील २० हजार ८८० पथविक्रेत्यांनी लाभ घेतला. संबंधितांना २० कोटी ८२ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात २० हजाराचे कर्ज दिले गेले. त्या अंतर्गत पाच हजार ९१८ पथ विक्रेत्यांना ११ कोटी, ८३ लाख आणि तिसऱ्या टप्प्यात ३९४ पथ विक्रेत्यांना एक कोटी ९७ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेने दिली.

हेही वाचा : ‘त्या’ शिक्षण संस्थांमध्ये लोकशाही आणणारच – पालकमंत्री दादा भुसे यांचा निर्धार

महानगरपालिका कार्यक्षेत्रात व्यवसाय करणारे व ज्यांनी अद्यापपर्यंत पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा सर्व पथविक्रत्यांना (छोटे व्यवसायिक) या योजनेचा लाभ घेता येईल. पीएम स्वनिधी योजनेचे ऑनलाईन अर्ज आपण राहत असलेल्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्र किंवा मनपा विभागीय कार्यालयात जाऊन ऑनलाईन अर्ज भरून बँकेत सादर करावा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशनकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पॅनकार्ड, आधार लिंक असलेला भ्रमणध्वनी क्रमांक, बाजार शुल्क पावती आणि युपीआय आयडी घेऊन जावे. पीएम स्वनिधी योजनेंतर्गत १० हजाराचे कर्ज मिळालेल्या पथ विक्रेत्यांसाठी केंद्र शासनाने ‘स्वनिधी से समृद्धी’ अभियान सुरु केले आहे. यामध्ये ज्या पथ विक्रेत्यांनी अद्याप पर्यंत पीएम मातृ वंदना योजना, जननी सुरक्षा योजना, पीएम सुरक्षा बिमा योजना, पीएम जीवन ज्योती बिमा योजना, पीएम जन धन योजना, पीएम श्रम योगी मानधन योजना, देशासाठी एकच शिधापत्रिका, इमारत व इतर बांधकाम कामगार या आठ योजनेचा लाभ घेतला नाही, त्यांनी लगतच्या मनपा विभागीय कार्यालयात जाऊन या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन माहिती भरून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : म्हाडाच्या भुई भाडेवाढीबाबत लवकरच योग्य निर्णय; गृहनिर्माण मंत्र्यांचे सीमा हिरे यांना आश्वासन

पथ विक्रेत्यांनी पीएम स्वनिधी व समृध्दी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच ज्यांनी कर्ज मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे, त्यांनी आवश्यक त्या सर्व दस्तऐवजासह बँकेशी संपर्क करून कर्ज प्राप्त करून घ्यावे व कर्जाचे हप्प्ते वेळेवर भरावे. ज्यांचे कर्जाचे हप्ते थकबाकीत आहे, त्यांना एकत्रित थकीत रक्कम भरून पुढील टप्प्याचे कर्ज उपलब्ध करून घ्यावे, असे महानगरपालिकेने म्हटले आहे.

Story img Loader