नाशिक – शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगारांना आता पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागणार आहे. संबंधितांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.
शहरात कारागृहातून जामिनावर सुटलेले एकूण ५५२ संशयित गुन्हेगार आहेत. यात सर्वाधिक १९७ संशयित नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून सर्वात कमी पाचजण हे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत.
हेही वाचा – नाशिक : वाहनांमधून कोट्यवधींचा मद्यसाठा हस्तगत, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
शहरात कायदा व सुव्यवस्था विस्कळीत करणारे आणि सध्या मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन संबंधितांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त शिंदे यांनी दिले आहेत. जामिनावर सुटलेल्या संशयितांमुळे सणोत्सवात शांतता बिघडू नये म्हणून त्यांच्या हालचालींवर नियमित लक्ष ठेवले जाईल. संशयितांच्या वर्तनात सुधारणा घडविण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तपास अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी सराईत गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या सूचना केल्या आहेत.
हेही वाचा – नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांची जळगावमधील ओंकारेश्वर मंदिरात पूजा
पोलीस ठाणेनिहाय संशयित
मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटलेल्या संशयितांची पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सुरुवात झाली आहे. यात पंचवटी पोलीस ठाण्यात ५५, म्हसरूळ ६१, आडगाव १८, भद्रकाली पाच, मुंबईनाका ५०, सरकारवाडा ११, गंगापूर १३, सातपूर २६, अंबड नऊ, एमआयडीसी चुंचाळे चौकी १०, इंदिरानगर १२, नाशिकरोड १९७, उपनगर ६१, देवळाली कॅम्प २४, अशा एकूण ५५२ संशयितांना पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.