नाशिक : चांदवड – मनमाड रस्त्यावर वाहन अडवून लूटमार करणाऱ्या सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख, ४८ हजार ७०० रुपये हस्तगत केले. विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रारदारानेच दरोड्याचा कट रचल्याचे उघड झाले. चांदवड-मनमाड रस्त्यावर आमीर उर्फ शोएब सय्यद आणि साक्षीदार सर्फराज ताडे यांना काही संशयितांनी अडवून चाकुचा धाक दाखवत रोख रक्कम तसेच भ्रमणध्वनी असा दोन लाख, ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपासाविषयी सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने या गुन्ह्याचा तपास करण्यात आला असता गुन्हेगार हे मनमाड येथील असल्याचे लक्षात आले.
हेही वाचा : अमळनेर मराठी साहित्य संमेलनाला राष्ट्रपतींची उपस्थिती?
पथकाने सराईत गुन्हेगार इंजमाम उर्फ भय्या सलीम सय्यद (२४), उजेर आसिफ शेख (२२), मोईन सय्यद, ओम शिरसाठ, हर्षद बिऱ्हाडे यांना ताब्यात घेतले. इंजमामची अधिक चौकशी केली असता वाहन चालक आमीर उर्फ शोएब सय्यद (२३. रा, मनमाड) याच्या सांगण्यावरून कट रचत चांदवड ते मनमाड रस्त्यावर हा दरोडा टाकल्याचा कट रचल्याचे उघड झाले. संशयितांच्या ताब्यातून रोख रुपये हस्तगत करण्यात आले. तपासी पथकाला उल्लेखनीय कामगिरीबद्दल १० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात महिला मतदारांमध्ये २२ हजारने वाढ, पुरुष मतदारांमध्ये ४४ हजारने वाढ
आमीर आणि गाडी मालक सर्फराज यांचे पैशाच्या देवाण घेवाणीवरून वाद झाले होते. आमीरने या भांडणाचा वचपा काढण्यासाठी इतर साथीदारांच्या मदतीने दरोड्याचा कट रचला. यातील इंजमाम आणि उजेर हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मनमाड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.