नाशिक : रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका महिलेसह ६२ जणांना सहा कोटीहून अधिक रुपयांना फसविल्याप्रकरणी पाच परप्रांतीयांसह सात जणांविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीरेश वाबळे (रा. जेलरोड) हे जिमखान्यात प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. १५ ते १८ डिसेंबर २०२१ या कालावधीत वाबळे यांचे परिचित शैलेंद्र महिरे यांनी भ्रमणध्वनीवरून संशयित रमणसिंग उर्फ विशालसिंग (रा. कोलकाता) याच्याशी वाबळे यांचे बोलणे करून दिले. रमणसिंगने महिरे यांच्या मुलाला रेल्वेत नोकरीला लावून दिले होते. त्यामुळे वाबळे यांचा रमणसिंग याच्यावर विश्वास बसला. रमणसिंगने वाबळे यांना त्यांच्या पत्नीस रेल्वेत नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखविले.
हेही वाचा : नाशिकमधील हजारो बाधित शेतकरी मदतीपासून दूर – केवायसी, बँक खाते, आधार संलग्नीकरणाचा अभाव
या कामासाठी रमणसिंगने बावळे यांच्याकडून आठ लाख रुपये घेतले. या कालावधीत रमणसिंग, निरज सिंग (रा. झारखंड), ऋतूराज पाटील उर्फ हेमंत पाटील (रा. सांगली), राजेंद्र सिंग (रा. कोलकाता), अंशूमन प्रसाद (रा. रांची), संदीप सिंग, जैद अली (रा. वाशी) यांनीही नोकरीचे आमिष दाखवत वाबळे यांच्याकडून पैसे उकळले. १५ डिसेंबर २०२१ ते १३ जून २०२४ या कालावधीत संशयितांनी भारतीय रेल्वेचे बनावट पत्र, कागदपत्रे, शिक्के बनवून वाबळे यांच्याकडून तसेच अन्य ६२ जणांकडून नोकरीचे आमिष दाखवत सहा कोटीहून अधिक रुपये उकळले. नोकरी मिळत नाही आणि पैसेही गेले, हे लक्षात येताच वाबळे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.